प्रार्थना तुझ्यासाठी

प्रार्थना तुझ्यासाठी

गार असलाजरी पहाटवारा तुझ्यापर्यंत पोचताना
जरा नाजूक असूदे तो, तुझ्या केसांशी खेळताना

या काट्यांशी माझ्या पायांची मैत्री जूनी आहे
गुलाबाचे गालीचे असूदे, तू पाऊल उचलताना

अबोल झाले जरी हे सोपे शब्द माझे
प्रेम डोळ्यात असूदे, तुझ्या डोळ्यात बघताना

वादळाची आवड तुलाही मलाही, पण
विजा माझ्यावर पडूदे, तू पावसात भिजताना

या गिटारच्या तुटतीलही बेताल तारा
त्या तालात असूदे तुझ्या मनाला छेडताना

गर्व असला जरी इथे प्रत्येका फूलाला
सगळे रंग बेरंग होऊदे, तू हळूच लाजताना

जगाच्या अंधारात एकटी पडलीस कधी तर
मी तुझ्यात असूदे, मी तुझ्याबरोबर नसताना

ओठ तर बिचारे मनाचे गुलाम ना ते
पण तुझे मन ही हसूदे माझे नाव घेताना

तुला जरी खोटी वाटली माझी वचने
या प्रार्थना आहेत माझ्या, तुझ्यावर प्रेम करताना

--मयुरेश कुलकर्णी