आलेल्या प्रत्येक क्षणाला, मनातल्या झळांना
गोड तुझ्या आठवाला, विरहाच्या कळांना
मधुर सुगंधी सहवासाला, मिठीतल्या फुलांना
तुझ्या हळुवार स्पंदनाला, भारावलेल्या श्वासाला
सलाम......
रात्रीच्या त्या शापांना, दिवसाच्या स्वप्नांना
पळालो त्या वाटांना, वाटेतील सोनेरी काट्यांना
गडबडलो जिथे त्या फाट्यांना, सावरले त्या पाट्यांना
सांभाळले त्या खांद्यांना, विसरलो जिथे त्या फांद्यांना
सलाम......
भेटलेल्या लोकांना, माणसातील पशूंना
डावातील कपटाना, पाठीवरल्या हातांना
झुकलेल्या मस्तकाला, क्षमाशील मनांना
ठोकरलेल्या लाथांना, भिजलेल्या डोळ्यांना
सलाम.........
माझ्यातल्या मी ला, तुझ्यातल्या तू ला
भोगलेल्या कौतुकाला, भिरकावलेल्या शिवीला
माथ्यावरच्या सूर्याला, मिट्ट काळोख रातीला
डोळ्यात फेकलेल्या धुळीला, मिळाली स्वप्ने त्या मातीला
सलाम.......
आलेल्या नाजुक मोक्याला, मिळालेल्या जबर धोक्याला
मारलेल्या तुझ्या हाकेला, चुकलेल्या त्या ठोक्याला
समाजाच्या धाकेला, नि जखमी त्या डोक्याला
जगण्याच्या या भिकेला, लाचार सोसलेल्या टीकेला
सलाम........
आता येईल त्या दिवसांना, बोलावणाऱ्या हाताला
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना, खुणावणाऱ्या नजरेला
धावू पाहणाऱ्या पायांना, वाट पाहणाऱ्या घराला
मनातील भयाण भीतींना, जगू पाहणाऱ्या जिवाला
सलाम........
अमोल कुंभार ०१-०१-२०१२