वृद्धाश्रमातील वृद्धव्यथा

कृष्णधवल मेघांनी

मन आसमंत भरून येतो

अन दाटलेल्या कंठास

त्याचवेळी बांध फुटतो ||१||

निर्जन प्रवाळयुक्त

आठवणींच्या बेटावर

निराधार मी भूतकाळात

घसरत जातो ||२||

बालपणी मातृप्रेमान बहरलेला वृक्ष

भर वसंतात पानगळ झाला

तरीही तयाची हरेक पर्ण जाली

काळजाच्या पुस्तकात मी जपत असतो ||३||


कौमार्यात जीवापाड जपलेला


मखमली मैत्रीचा मोरपीस हरवून गेला

जरी आजही मिळणार नसला

तरीही तयाला उगीचच शोधात हिंडतो ||४||

तारुण्यात हृदयात पुजलेली मासोळी

विश्वास मोडून सागरात निघून गेली

तरी आजही ती सुखी असावी म्हणून

किनाऱ्यास बोलत बसतो ||५||

गृहाश्रमात पवित्र बंधनांनी एकरुपलेली अर्धांगिनी

डावाच्या अंती निघून गेली कायमची

तरीही ती माझ्या नयनातच आहे

अस म्हणत म्हणत मी जगात असतो ||६||

वार्धक्यात आता

पोटची पोर जेव्हा वृद्धाश्रमात धाडतात

तेव्हा नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात

अन पुन्हा मी त्याच

निर्जन प्रवाळयुक्त आठवणींच्या बेटावर

घसरत राहतो एकटाच

अगदी एकदाच ||७||

-शीतल