पोळले काळीज तेव्हा नितळली माझी गझल!

गझल

पोळले काळीज तेव्हा नितळली माझी गझल!
दाटला काळोख तेव्हा उजळली माझी गझल!!

पाहिला जवळून मी एकांत ओलेता तिचा;
चिंब कायेतून अलगद निथळली माझी गझल!

याचसाठी मैफिलींनी टाळले बहुधा मला....
मोडुनी संकेत सारे उसळली माझी गझल!

वेचले जातील माझे शब्दही सुमनांपरी!
एवढी रंगात माझ्या मिसळली माझी गझल!!

ती गझल माझीच होती, वाटले नाही मला;
गात तो होता असे की, विव्हळली माझी गझल!

ओसरे कल्लोळ जेव्हा स्पंदनांचा अंतरी;
त्याचवेळी जाणतो मी...निवळली माझी गझल!

शायराचा पिंड माझा, श्वास आहे शायरी....
मात्र मी वेड्याप्रमाणे उधळली माझी गझल!

वाटतो माझाच मजला आज हेवा केवढा!
माझियामागे तिनेही कवळली माझी गझल!!
                         
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१