नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट
प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट
नभात पाहा खोळंबली ही चांदण्यांची वरात
अजुनी थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात
सुगंधास्तव तुझ्या झुरते बहरून रातराणी एकांतात
दूर लवलवते तेल घालूनी ज्योत नयनी गवाक्षात
थरथरे पालवी अस्वस्थपणे तरंग उठवुनी डोहात
ताटकळते उभी तशीच ओल्या दवात भिजुनी चिंब रात
जागली तरी तशीच बसली ती पाखरे अजुनी कोटरात
तुझ्या आगमनाची अशी प्रतीक्षा राहिली भरुनी चराचरात
जरी होईल निस्तेज तो दिशा उजळता होऊनी प्रभात
तरी थांबला बघ तुला पाहण्या चंद्रमा अजुनी अंबरात...