प्रदीर्घमालिका

वयाची पस्तिशी ओलांडेपर्यंत टीव्ही ऊर्फ खुळा खोका या प्रकाराशी फारशी गाठ पडली नव्हती. घरात टीव्ही नको हे तत्व मातापित्यांनी निष्ठेने पाळले.

मी पस्तिशी ओलांडल्यावर टीव्ही घेतला. पण मालिका पहाण्याची सवय अशी नसल्याने ते व्यसन जडले नाही. तीन तेरा पिंपळपान, भाग्यविधाता, घडलंय बिघडलंय या मालिका नियमित पाहण्याचा प्रयत्न केला. पण फारसे भावले नाही.

तसेही अर्थार्जन नोकरीमार्गे नसून फ्रीलान्समार्गे असल्याने कामाचा वेळा अनिश्चित असत.

सुमारे २०१७-१८ पासून वेबसीरीज हा एक शब्द माहीत झाला. पण त्याचा अर्थ समजून घ्यायला कोव्हिडने आणलेली स्थानबद्धता कारणीभूत ठरली.

सुरुवातीला भारतीय वेबसीरीज बघितल्या. त्यातली इन्साईड एज ही सोडली तर इतर फारशा रुचल्या नाहीत. इन्साईड एज ही वेबसीरीजही सीझनगणिक प्रगल्भ होत गेली म्हणून भावली. मिर्झापूर मधली निरर्थक निर्लज्ज नग्नता नि बटबटीत शिवराळपणा अजिबात भावला नाही. त्यातल्या काम करणाऱ्या नटनट्या (अलि फजल, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी, राजेश तेलंग, शीबा चढ्ढा, दिव्येंदु शर्मा आदि) आवडीच्या असूनही एकदोन एपिसोड्स पाहिल्यावर त्या सगळ्यांची कींव वाटू लागली नि थांबलो. नग्नताच हवी असली तर एक्सव्हिडिओज नाहीतर पोर्नहब का नको? वमनकारक शिवराळपणाच हवा असल्यास संजय राऊत वा नितेश राणे का नकोत? थेट नि रोखठोक मामला.

हळूहळू कळाले की पाश्चिमात्य देशांत मोठमोठ्या एपिसोड्सच्या (तास दीड तासांचा एक एपिसोड) प्रदीर्घमालिका सहस्त्रकाच्या सुरुवातीपासून रुळल्या आहेत. आणि आता त्या आपल्याकडे वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. त्या प्रांतात शिरलो.

त्यातल्या विनोदी मालिकांबद्दल बरेच काही लिहिले-बोलले जाते. पण माझी मुख्य अडचण अशी की 'कॅन्ड लाफ्टर' ही सवंग संकल्पना मला अजिबात झेपत नाही. कुणीतरी दंडुका हातात घेऊन "आता हस फोकळीच्या" म्हणत मागे उभे असल्याचा भास होतो. त्यामुळे मला फ्रेंड्स, एलेन आणि तत्सम मालिकांवर पाणी सोडावे लागले. वेळ वाचला.

पहिली प्रदीर्घमालिका सापडली ती म्हणजे 'द गुड वाईफ'. लीगल-पोलिटिकल पार्श्वभूमी असलेली ही प्रदीर्घ मालिका - १५६ एपिसोड्स, प्रत्येक एपिसोड सुमारे पाऊण तासाचा, सगळे मिळून शंभरहून अधिक तास - अनेक कारणांनी शेवटाला नेली. एक म्हणजे त्यातील कथानक तत्कालीन अमेरिकन राजकारणावरती जे भाष्य करते ते माहितीपूर्ण आणि तरीही वेधक होते. अमेरिकन राजकारणातील दुभंग (रिपब्लिकन-डेमोक्रॅट) किती खोल रुजलेला आहे हे छोटछोट्या प्रसंगांतून उलगडत गेले. तिथल्या राजकारणात 'लॉबिस्ट' ही उघड आणि मान्यताप्राप्त संकल्पना आहे. त्याबद्दलही कळाले.

पंचवीसतीस तास गेल्यावर जाणवले की आता आपल्याला या मालिकेचे व्यसन लागले आहे, शेवटाला नेण्यावाचून गत्यंतर नाही. त्यातली पात्रे, त्यांचे बोलणे नि देहबोली सवयीची झाली. मुख्य भूमिकांतली ज्युलिआना मार्गुलिस, मॅट झुकरी, आर्ची पंजाबी, जॉश चार्ल्स, ख्रिस्तीन बरान्स्की ही ओळखीची झालीच. पण त्यातले ऍलन कमिंग्जचे काम आणी झॅक ग्रेनिअरचा खरखरीत खर्ज विशेष लक्षात राहिले. आणि एरवी इंग्रजी चित्रपटांतून छोट्या भूमिकांतून दिसलेली नटमंडळी इथे दिसल्यावर एक वेगळीच गंमत वाटे. त्यांच्यातले काहीजण - गॅरी कोल, मार्था प्लिम्प्टन, कॅरी प्रेस्टन, मॅमी गमर, मायकेल फॉक्स, डिलन बेकर - तर मुख्य भूमिका साकारणाऱ्या पात्रांइतकेच दुय्यम भूमिकांत पूर्ण विरघळून गेलेले जाणवले.

दुय्यम भूमिकांत काही दादा मंडळीही होती. टिटस वेलिव्हर, मॅथ्यू पेरी, अमांदा पीट आदि. टिटस वेलिव्हर 'बॉश' या प्रदीर्घमालिकेचा मुख्य नट. मॅथ्यू पेरी हा फ्रेंड्स मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला, पण माझी गाठ 'सेवन्टीन अगेन' आणि 'द होल नाईन यार्ड्स' या चित्रपटांमध्ये पडली. अमांदा पीट 'द होल नाईन यार्ड्स' आणि 'गलिव्हर ट्रॅव्हल्स' या चित्रपटांत दिसलेली.

ही प्रदीर्घमालिकेमुळे मालिकाग्रस्त मंडळींची मानसिकता मला अगदी खोलवर अनुभवायला मिळाली. आणि हेही जाणवले की 'सास भी कभी बहू थी' वा 'कहानी घर घर की' बघणारी मंडळी आणि आपण यांत तत्वतः फरक नाही. मान्य करायला जड गेले पण अखेर पटले.

'द गुड वाईफ' मधले कथानक आणि मुख्य भूमिकेत 'गुड वाईफ'मधल्या दुय्यम भूमिकेतले एक पात्र घेऊन 'द गुड फाईट' नावाची दीर्घमालिका निघाली. प्रदीर्घमालिका नाही. सात सीझन नि सीझनमध्ये दहाबाराच एपिसोड्स. पण जरी पाया लीगल-पोलिटिकल असला आणि तत्कालिन परिस्थितीवर (ट्रम्प अध्यक्ष असण्याचा काल) भाष्य असले तरी पकड उणावलेली जाणवली.

दुसरी दीर्घमालिका पाहिली ती म्हणजे रिझोली ऍन्ड आइल्स. सगळे मिळून सुमारे ऐंशी तास. दोन मुख्य पात्रे, दोन्ही स्त्रिया. एक पोलिस डिटेक्टिव्ह, एक पोस्ट-मॉर्टेम करणारी डॉक्टर. माफक आणि स्वच्छ विनोद, अंगभर कपडे बाळगणारी पात्रे असलेली ही मालिका मुख्यत्वे पाहिली ती ऍंजी हार्मन आणि साशा अलेक्झांडर या दोघींसाठी. ऍंजी हार्मन आधी 'एजंट कोडी बॅंक्स' या चित्रपटात पाहिले होते. साशा अलेक्झांडरला 'येस मॅन' चित्रपटातल्या एका छोट्या भूमिकेत. गॉसिप म्हणजे साशा अलेक्झांडर खऱ्या आयुष्यात सोफिया लॉरेनची सून.

इथेही 'मालिकाग्रस्त' झालो ते मुख्यत्वे 'सर्वकाही माफक प्रमाणात' या तत्वामुळे. त्यामुळे दोन्ही नट्या सोडता फार लक्षात राहण्याजोगे या मालिकेत काही नव्हते. एक सोडता. पहिल्या चार सीझन्समध्ये एक मुख्य पात्र साकारणारा 'ली थॉम्सन यंग' या नटाने खऱ्या आयुष्यात आत्महत्या केली. मग मालिकेतल्या त्याने साकारलेल्या पात्राला कथानकात मरावे लागले. त्यानंतरच्या काही एपिसोड्समध्ये बाकीची नटमंडळी अभिनयाबाहेरही भावुक झाल्याचे जाणवले.

सर्वात लक्षणीय प्रदीर्घमालिका पाहिली ती म्हणजे 'हाऊस'. ग्रेगरी हाऊस हा उर्मट नि तुसडा डॉक्टर. वैद्यकीय क्षेत्रातला (डायग्नॉस्टिक मेडिसिन) शरलॉक होम्स. प्रत्येक एपिसोडमध्ये एक पेशंट गुंतागुंतीचा आजार/विकार घेऊन येतो. हाऊस आणि त्याचा चमू टप्प्याटप्प्याने ते कोडे सोडवते.

हाऊसला स्वतःला व्हायकोडिन या वेदनाशामक गोळ्यांचे व्यसन आहे. हाऊस पूर्णतया स्वार्थी आहे. आलेल्या रुग्णाचा जीव धोक्यात घालायला हाऊस अजिबात कचरत नाही. हाऊस इतर पात्रांच्या आयुष्यात ढवळाढवळ करताना कसलाही विचार करीत नाही. 'पोलिटिकली इनकरेक्ट' हा मुख्यभाव बाळगून तो कायम तुच्छतेने बोलतो. त्याला मैत्री या भावनेशी घेणेदेणे नाही. आणि बॉस म्हणून तो निव्वळ क्रूर आहे.

एवढ्या सगळ्या गोष्टी उणे असलेली ही व्यक्तिरेखा तरीही प्रेक्षकांना करकचून बांधून ठेवते. ह्यू लॉरी या ब्रिटिश नटाने ही भूमिका साकारली आहे. तो ब्रिटिश आहे हे सांगावे लागते इतका त्याने अमेरिकन ऍक्सेंट आत्मसात केला आहे. दुसरे मुख्य पात्र साकारले आहे रॉबर्ट शॉन लिओनार्ड या नटाने. 'डेड पोएट्स सोसायटी' या गाजलेल्या चित्रपटात रॉबिन विल्यम्सच्या बरोबरीने झळकलेला हा गुणी नट. बाकी भूमिकांत लिसा एडेल्स्टीन, ओमर एप्स, जेसी स्पेन्सर, जेनिफर मॉरिसन, पीटर जेकब्सन, ऑलिव्हिया वाईल्ड आदि.

ह्यू लॉरी परत गाठ पडला 'स्ट्रीट किंग्ज' या चित्रपटात. पण 'हाऊस'चा माझ्यावर इतका प्रभाव पडला होता की तो चित्रपटही 'हाऊस'चा एक एपिसोड असल्यागत बघितला.

ही मालिका दोनेक महिने आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. शेवटला एपिसोड खरे तर मालिकेबाहेरचा आहे. 'बिहाईंड द सीन्स' या प्रकारचा. शेसव्वाशे तासांच्या 'दिसणाऱ्या' भागामागे किती हजार तासांची तयारी नि कशी हे कळते.

'हाऊस' बघणे थांबवून महिना झाला. अजूनही काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखे वाटते आहे. 'हाऊस'च्या पठडीतली कथा म्हणून 'द गुड डॉक्टर' बघण्याचा प्रयत्न केला पण गणित जमले नाही.

आता स्पॅनिश मालिकांकडे वळलो आहे. त्याबद्दल नंतर.