ब्रिज

"ओह, शक्स!" गौरी उद्गारते.

"वन हार्ट" स्टेला जाहीर करते,

तिच्या नेहमीच्या भावनाशून्य कंटाळलेल्या स्वरात.

"वन हाआर्ट", फरीद बोंबलतो, "पास, कमिंग टू यू सर"

"हम्म..." मी विचार करतो,

आणि अखेर जाहीर करतो, "टू क्लब्स".

स्टेला ओठांचे कोपरे नि भुवया उंचावून माझ्याकडे रोखून बघते.

ती संदेश पाठवते आहे की एकतर तिला मी काय म्हणतो ते समजत नाहीये

वा समजतेय आणि आवडत नाहीये.

गौरीने पत्ते एकत्र करून मुठीत धरलेत.

एका खोल निःश्वासासह.

गौरीचा संदेश आहे की ती या डावात पुढे काही बिडिंग करणार नाही.

फरीद पाकिटातून सिगरेट काढून पेटवतो आहे.

त्याचा संदेश आहे की तोही बिडिंग करणार नाही,

पण आम्ही संभाळून रहावे.

आमचा कॉल काहीही करून डिफीट करण्याचा तो मनापासून प्रयत्न करणार आहे.


आमचा रोजचा ब्रिजचा अड्डा सुरू झालाय.


आम्ही कोण आहोत?

एका दृष्टीकोनातून, दोन पुरुष, दोन स्रिया.

दुसऱ्या दृष्टीकोनातून, एक ख्रिश्चन, एक मुसलमान आणि दोन हिंदू.

तिसऱ्या दृष्टीकोनातून, दोन तरुण, एक मध्यमवयीन आणि एक वयस्कर.

चौथ्या दृष्टीकोनातून, चौघांपैकी तीन धूम्रपान करणारे.


पण ही सगळी वर्णने गरजेबाहेर उथळ आहेत.

खरे सांगायचे तर, 

आम्ही चौघे साधे व्यसनासक्त आहोत.

दर संध्याकाळी प्रामाणिकपणे एकत्र येणारे.

पावसाचा कहार असो वा थंडीचा कडाका.


उरलेले तिघे चरितार्थासाठी काय करतात,

हा प्रत्येकाच्या मनात अनुच्चारित प्रश्न.


आमच्यातला समान धागा म्हणजे,

आम्ही आमच्या आयुष्याची व्याख्या करण्यासाठी पत्ते वापरतो.

चार प्रकार, दोन रंग,

प्रत्येक पत्त्याचे मानाच्या उतरंडीवर ठरलेले स्थान,

किलावर दोन ते इस्पिक एक्का.

प्रत्येक प्रकारात तेरा पाने.


आणि खेळात प्रत्येकाला एक जोडीदार.


शेवटी , आयुष्य म्हणजे काय?

प्रत्येकाच्या/प्रत्येकीच्या वाट्याला लिहिलेला

एक लोकांचा संच,

एक कौशल्याचा संच,

एक वागणुकींचा संच,

एक परिस्थितींचा संच.

आणी त्या संचांचा जास्तीतजास्त फायदा करून घेण्याची धडपड.


वेळ आली की,

सगळे काही खाली ठेवून

अंत, शेवट, मृत्यू, निर्वाण, खलास.

मग तुम्ही झळाळत जिंकला असाल, वा सपाटून हरला असाल.


आमच्यासारखेच.

'सेव्हन नो ट्रंप' जिंका वा 'वन क्लब' हरा.


आमची जीवनाची व्याख्या जास्ती योग्य वा जास्ती बरोबर वा एकुलती एक,

असे आमचे अजिबात म्हणणे नाही.


पण आमच्यासाठी तरी,

ही व्याख्या जास्ती रोमांचक आहे.