'आज तो परत दिसावा त्याचे नांव तरी विचारू-' हा विचार मनांत आल्यावर तिला स्वत:चीच लाज वाटली. पण तो त्या दिवशी दिसलाच नाही. शनिवार म्हणून जरा लवकर घरी जात असलेली रेवा बसमध्ये चढल्या वरही मागच्या काचेतून वळून पाहत होती. दोन दिवसात घरगुती कामाच्या रगाड्यात तिला कसलीच आठवण आली नाही. सोमवारी तिघींतल्या एकीने जेवताना तिला विचारले,
'रेवा, लग्न करणार तू त्याच्याबरोबर ?' ही पोरगी कुणाबद्दल बोलतेय ते कळायला दोन मिनिटे लागली तिला, तोवर बाकीच्यांचे फिदीफिदी सुरू होते......
रोज सायंकाळी बसस्टॉप वर उभे राहायचे, एकाच वाटेकडे सारखे सारखे वळून पाहायचे.... अगदी बसमध्ये चढल्यावरही मागच्या काचेतून वळून पाहायचे हा छंद आपल्याला कसा जडला तेच तिला कळले नाही. वासंतीची आठवण आपल्याला का येतेय हेही तिला कळेना....
रोजच्या सवयीनुसार तिने ऑफिसच्या इमारतीतून बाहेर पडल्या पडल्या त्या वाटेवर नजर फिरवली व अचानक तिची नजर त्या मोटर सायकलवर खिळली. बसस्टॉप कडे चालत असताना तिरक्या डोळ्यांनी ती त्याचा वेध घेऊ लागली व तो दिसला....
'आज सरळ त्यालाच त्याचे नांव विचारायचे का ?' '
नको, बरे नाही दिसत !'
असे विचार मनांत घोळवत असताना तो सरळ तिच्याकडे चालत येत असलेला पाहून तिच्या हृदयांत धडधडायला लागले....
एका मधुर घंटेच्या किणकिणल्याचा तोच स्वर कुठून तरी तिला ऐकू आला...
"जरा बोलशील का माझ्याशी ?"
"हो..पण.....ह्या इथे ?" चाचरतच तिने विचारले.
"नाही समोर 'स्वागत' मध्ये बसू, मी जरा बाईक लावून येतो, तू वरच्या माळ्यावर एखादे रिकामे टेबल पकड" अधिकार वाणीने तो बोलत होता.....
स्वागत कडे चालत असताना आपण आपल्या नकळत त्याचे का ऐकतोय तेच तिला कळेना.... विचारांच्या घालमेलीत ती स्वागत हॉटेलच्या वरच्या भागात आली. जेमतेम येऊन टेकते न टेकते तोच तो आला.
"माफ कर, मला तुला फार त्रास द्यायचा नाही पण माझे एक छोटे काम होते"
"माफ करा; मी त्या दिवशी आपले नांवही नीट ऐकले नाही"
"मी ते सांगितले कुठे ?"
"ओह, कारण नेमका तेंव्हाच कसलातरी मोठा आवाज झाला व माझे लक्ष विचलित झाले होते "
" फिरोज़ खंबाटा !" फक्त दोनच शब्दांत त्याने स्वत:ची ओळख करून दिली.
"आपण केलेल्या मदती...."
" बस करशील का आता ते ?" नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. "तू चांगल्या घरची मुलगी दिसतेस म्हणून तुला विचारावे की नाही ह्याचा विचार मी करीत होतो. पण मी जे काम तुला सांगणार आहे ते अजून कोणी करू शकेल असे मला वाटत नाही."
"बोला.., मला जमले तर मी नक्की करीन पण ते सरळ मार्गी असेल तरच करीन हेही सांगते !"
परत तेच स्मित त्याच्या नजरेत दिसले. "काळजी करू नकोस, घरंदाज मुलीला करता येण्यालायक कामच मी सांगेन" इतक्यात वेटर येऊन उभा राहीला- काय खाणार-पिणार ह्या औपचारिक विचारणेच्या भानगडीत न पडता दोन कप कॉफीची मागणी त्याने वेटरला केली.
"माझा एक मित्र आहे, त्याची मैत्रीण वासंती इथेच कुठेतरी कामाला आहे. तीच्या बद्दल जरा माहिती काढायची आहे."
क्षणभर काय बोलावे ते तिला कळलेच नाही. पण लगेच स्वत:ला सावरून तिने चेहऱ्यावर स्थितप्रज्ञाचे भाव आणण्याचा प्रयत्न केला.
"आपण अजून काही माहिती द्या, मी बघते तिला कोणी ओळखते का ते !" कॉफी केंव्हा येते व संपवून आपण केंव्हा सटकतो असे रेवाला झाले.
"ती *** ह्या कंपनीत अकाउंट्सचे काम बघते" माहीत आहे हा शब्द रेवाने घशांत आवंढ्याबरोबर गिळला.
"तिची व माझ्या मित्राची मैत्री नुकतीच झाली होती. एकमेकांना ते पूर्णपणे ओळखण्याच्या आतच ती काही दिवसांपासून गायब आहे."
" तिला नसेल भेटायचे त्याला " अगदी सहजतेने तिने वासंतीची बाजू मांडायचा प्रयत्न केला पण तो आपल्याकडे रोखून पाहतोय हे लक्षात आल्यावर ती गडबडीत म्हणाली, "म्हणजे एका मुलीला कदाचित नंतर असे वाटले असेल, की त्या मुलाची मैत्री नको "
"नाही, तसे नसावे कारण घरून ऑफिसला निघण्यासाठी ते बरोबर निघाले होते व रस्त्यातच त्या मुलीच्या म्हाताऱ्याने, आय मीन, वडिलांनी पाहिले होते... मुलीला बरोबर घेऊन तिचा बाप सरळ घरी गेला असे माझा मित्र सांगतो "
रेवा गप्प होती. वासंतीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिल्याचे तिची आई म्हणाली होती म्हणून ह्या समोरच्या युवकावर, फिरोज वर विश्वास ठेवणे तिला भाग होते. जेमतेम त्या वेळेपुरते संभाषण संपवून रेवा घरी जायला निघाली तेंव्हा वासंती, राज व फिरोज़चा विचार तीच्या डोक्यातून जात नव्हता.
झोपायचा प्रयत्न करूनही ती जागीच होती. फिरोज़ भेटल्यापासून ती सतत विचारच करीत होती. ह्याला जर दोन दिवसांत वासंती बद्दल कळले नाही तर ऑफिसमध्ये येऊन थडकायचा.
ऑफिसमधल्या पोरींनी ह्याला आपल्या बरोबर बोलताना पाहिलेले आहे. त्यात हा वासंतीची चौकशी का करतोय हे नंतर त्या मुलींना कसे पटवायचे ?
परत त्याला आपण त्याच ऑफिसमध्ये दिसणार म्हणजे तो विचारेलच की, तू मला आधीच का नाही सांगितलेस ?
छ्या, साफच गोंधळ झाला होता !
अचानक तिला आठवले फिरोज़ने स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड तीच्या कडे जाता जाता दिले होते. नशीब तिने ते पर्समध्ये ठेवले - उद्या ऑफिसातून काही तरी खरेदी करायच्या बहाण्याने बाहेर पडून त्याला फोन करावा लागणार होता..... त्याला काय सांगायचे ह्या विचारांत असतानाच तिला झोपेने घेरले....
दुपारी लंच नंतर 'जरा खाली जाऊन येते' असे मोकाशींना सांगून ती सटकली. ऑफिसच्या इमारतीला मोठा वळसा घालून एका सार्वजनिक फोन वरून तिने त्याला फोन लावला.
सुरुवातीला एका मुलीने, नंतर माणसाने फोन घेतला दर वेळी काय काम आहे विचारपूस करूनच फोन शेवटी फिरोज़ला दिला गेला "बोल रेवा," परत तोच घंटीचा मधुर स्वर तिला जाणवला
"वासंती माझ्याच ऑफिसमध्ये काम करते...."
"मला माहीत आहे, पुढे बोल..."
आता चकीत व्हायची वेळ रेवाची होती. "तिने गेल्याच आठवड्यात राजीनामा दिलाय"
"ते ही मला माहीत आहे."....
रेवा उखडली, "मग काय माहीत नाही ते सांगा म्हणजे मी तेव्हढेच बोलेन"
"सध्या ती कोठे आहे"
"ते मलाही माहीत नाही !"
"साफ खोटे ! कारण तुझ्याकडे तिचे पत्र व राजीनामा दोन्ही पोहचले आहेत"
रेवा निःशब्द उभी होती... फोन वाढवण्याचा संदेश बीप करायला लागल्यावर ती भानावर आली.
"मी संध्याकाळी येतो, स्वागतमध्येच बसूया " अधिकारवाणीने फिरोज़ने तिला कळवले.
तिने डोलवलेली मान त्याला फोनवर दिसली असती तर त्याला हसू आवरले नसते !
क्रमशः