दौऱ्यावरचा तोही एक कामाचा दिवस होता. असलेल्या वेळात जास्तीत जास्त काय हाती लागेल याचा वेध घेत काम चालू होते. तरी आजचा दिवस तसा फ़ुरसतीचा म्हणवा लागेल. सगळी कामे एकाच शहरात, शहरही तसे मर्यादित विस्ताराचे, सुदैवाने वाहतूकही विशेष वा रखडवणारी नाही त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यात फारसा वेळ मोडत नाही. पर्यायाने जरा स्वास्थ्य असते. मग जिथे जाल तिथे आगत स्वागत, चहा मग जरा इकडच्या तिकडच्या गप्पा असे करत कामाला सुरुवात. मग त्यांच्या कामाचा आवाका, उलाढाल, उत्पादने, ती कुठे कुठे निर्यात होतात त्याची चौकशी.
वेळ असल्यामुळे १२.३० च्या सुमारास जेवणासाठी काम थांबवायचे ठरले. मस्त पैकी जेवण झाले, जेवून परत आलो आणि कामाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. आता प्रत्यक्ष कारखान्यात शिरलो होतो. बरोबरची यजमान मंडळी उत्साहाने आपला कच्चा माल, यंत्रसामग्री, आपली वाकबगारी, प्रक्रियाशृंखला, काटेकोर तपासणी, दर्जा टिकवण्यासाठी केलेले कडक निवडकाम, उत्पादनाची प्रतवारी वगरे दाखवितं होते. बरोबरीने अनेक कामगार व अधिकारीही कुतूहलाने वावरत होते. काही निर्विकारपणाने आपले काम करीत होते.
आम्ही शेवटच्या म्हणजे परीक्षण/ चाचणी विभागात आलो. इथे उत्पादनाच्या बाह्यस्वरुपा बरोबरच प्रत्यक्ष कार्याच्या व कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या जात होत्या. अधिकारी अगदी मन लावून आपली कार्यपद्धती व दर्जा टिकवण्यासाठी काटेकोर चाचण्या कशा केल्या जातात ते समजावून सांगत होते. यजमान मंडळींपैकी इंग्रजी येणारे व हुंगयान आम्हाला ते इंग्रजीत समजावत होते. साधारण तांत्रिक गोष्टी भाषा न समजता देखिल त्यांचा कृतीवरून अंदाजाने समजत होत्या. पुढे आपल्याकडेही हे सर्व उद्योग करायचेच आहेत तेंव्हा चाचण्या कशा करतात, काय साधनसामग्री वापरतात याचे चित्रण अनिवार्य आहे हे माझ्या ध्यानात आले. माझा तिसरा डोळा सतत माझ्याबरोबर असतोच, आताही होता. फक्त जड थैला भरल्यापोटी खांद्यावर वागवायचे जीवावर आल्याने तो मी यांच्या कचेरीतच ठेवला होता आणि त्यात माझा प्रकाशचित्रक होता. मी यजमानांना सांगून कचेरीकडे निघालो तसे माझ्याबरोबर तिथला व्यवस्थापक, एक भागीदार तसेच आम्हाला आणायला आलेला सारथी असे सगळेजण निघाले. सोबतीचे निमित्त, त्या निमित्ताने कचेरीत दोन घोट गरम छा आणि धूम्रपान. हे सगळे एव्हाना माझे धुम्रमित्र झाले होते. बाहेर असताना तेव्हढाच विरंगुळा.
माझा सर्वसाक्षी घेऊन, चहापान वगरे पटकन आटोपते घेऊन आम्ही परत कारखान्यात शिरलो. माझे लक्ष सहजच डावीकडे असलेल्या कोठाराकडे गेले. इथे बऱ्याच जुन्या वस्तू म्हणजे साचे वगरे व काही निरुपयोगी साहित्य पडलेले होते. माझी पावले तिथेच थबकली. मी डावा हात आडवा करून सर्वांना थांबवले व ओठावर उजव्या हाताचे बोट धरून आवाज न करण्याची सूचना केली. त्या अडगळीत एक चिमुकला फिरत होता. बरेचदा बाळाला सांभाळायची सोय नसलेल्या कामगार स्त्रिया आपापल्या कामाच्या जागी बाळाला घेऊन आलेल्या मी पाहिल्या होत्या. हे असेच कुणा कामगाराचे बाळ असावे.
छोकरा मोठा गोड होता. थंडीने फुटलेले गाल, वाहणारे नाक, मऊशार पण विरळ असे भुरे केस, गोरापान वर्ण, अंगावर फिक्क्या बदामी रंगाचा व गडद गुलाबी बाह्यांचा लोकरी अंगरखा खाली गरम कपड्याची पिवळी विजार. स्वारी सरळ रेषेत उजव्या बाजूला एकटक पाहतं होती. काय तंद्री लागली होती कोण जाणे. पापणी देखिल न लवणारा तो छोटु मोठा विचारमग्न दिसत होता. मी काहीवेळा तसाच बघत राहिलो. काय बरे विचार करत असावा तो? कोण असेल तो? काय होते त्याचे भवितव्य? तो मोठेपणी काय होईल? असाच एखादा कामगार की धडाडीचा उद्योजक की मोठा निर्यातदार. त्याच्या विरळ पण उंचावलेल्या भुवया, रोखलेली नजर व स्तब्ध चेहरा मला भुरळ पाडत होते. मी चपळाईने माझे हत्यार सज्ज केले व आवाज न करता चोरपावलाने त्या खोलीच्या दाराकडे गेलो आणि त्याला त्याच भावमुद्रेत प्रतिमाबद्ध केला.
त्याची तंद्री लागली असे म्हणत मीही बहुतेक हरवलो होतो. माझ्या लक्षात आले की एव्हाना तिथे बऱ्याच बायका जमल्या होत्या. एक परदेशी पाहुणा सर्वत्र पांढरी पूड पसरलेल्या जमीनीवर गुडघे टेकून आपल्यापैकी एका छोकऱ्याचे चित्रण करतो आहे ह्याचे त्यांना बरेच अप्रूप वाटले असावे. कुणीतरी ही बातमी तोपर्यंत छोटुच्या आईला सांगितली असावी. माझ्या बरोबरच्यांना मी टिपलेली छबी दाखवली, तशी धिटाईने हळूहळू महिलामंडळीही जवळ येऊन कुतूहलाने पाहू लागली. त्या छोटूच्या आईला सगळ्या बायका काहीतरी सांगत होत्या. आपल्या बाळाचे रुपडे एका परदेशी पाहुण्याने आवडीने टिपले व आपला बाळ सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला ह्यामुळे ती माउली भांबावूनच गेली होती.
तिने पटकन आपल्या बाळाला उचलून घेतले. मी तिला जवळ बोलावले आणि आणि मी टिपलेली तीच्या बाळाची छबी तिला पटलावर मोठी करून दाखवली. प्रतिमा पाहताच तिचे डोळे विस्फारले. तिने आपल्या बाळाचे पटापट मुके घेतले, व त्याला घट्ट जवळ घेतले. ती बाळासह माझ्याकडे वळली व कृतज्ञ भावाने काहीतरी बोलू लागली. काय सांगत होती समजत नव्हते पण काही ओळख देख नसतानाही आपल्या बाळाची छबी टिपल्याबद्दल ती आभार मानत असावी. आज तिचा बाळ सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला होता. सर्वजण ती प्रतिमा व मग बाळाचा चेहरा असे पाहत त्याच्या गालाला हात लावत होते. त्याची आई तर खूश झाली होती. आपल्या बाळाला कुठे ठेवू नी कुठे नाही असे तिला झाले असावे.
तीच्या चेहऱ्यांवरचा आनंद पाहून मला एखादा पुरस्कार मिळाल्यासारखे वाटले आणि तो पुरस्कार मला याआधी मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा मोठा वाटला. आपल्या कृतीमुळे दुसऱ्याला मनापासून झालेला आनंद हाच खरा पुरस्कार!
