नाव कुणाचे ओठांत?

मेंदीभरल्या हातात ओले हळ्दीचे हात
पोरी हासून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
मेघभरल्या नभात चांद बसला लपून
पोरी आळ्वून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
राघू पिंगट अंगाला जाती करूनि लगट
पोरी मुर्डून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
पांदी मधल्या वाटेत फूल दिसता अव्चित
पोरी वाकून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
रान भारल्या मातीत असे पेटले होरीत
पोरी झिंगून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
चंद्रमवळी सप्रात साजण आला गं भरात
पोरी लाजून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
पौषा मधल्या थंडीत साजण नाही गं घरात
पोरी जागून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
सुन्या उदास अंगणी दिवा तुळशीचा जळे
पोरी आठ्वून गं घेती नाव कुणाचे ओठांत?
डोळा भरल्या पाण्यात बुडे आठवांचा गाव
पोरी जपून गं घेती नाव कुणाचे ओठांत?