भय मनाचं

माझ्या 'बंद ओठ माझे' ह्या कवितासंग्रहातून...


तू समोर दिसलास की फार भीती वाटते
कारण मग...
नजर माझी हळवी बनते
तिला कोवळी पालवी फुटते


नजरस्पर्श झाला की फार भीती वाटते
कारण मग...
मन वेड्यागत काहूरतं
शरीर उगाच शहारतं


शरीर नुसतं शहारलं तरी फार भीती वाटते
कारण मग...
वेडे स्पर्श खुणावतात
स्वप्नं माझी दुणावतात


मन - देह सारं सारं वादळवारं होऊन जातं
सावरता सावरता कठीण सारं होऊन जातं.