देणं

मेघराजा सांग मज तुझं पाणी कुठं गेलं ?
काळं घोंगडं ओढून नभ उतरून आलं !


नभ आलं उतरून आली कशी अवकळा
जीव तीळ तीळ तुटे देई पाण्याविन कळा !


नांगरल्या धरिणीला इथं वित वित भेगा
सारं करून सवरून का रे देशी असा दगा ?


कशी साजिरी गोजिरी माझ्या बैलांची रं जोडी
तुझ्या वाटेकडे डोळे.... थकून गेली वेडी !


किती करावे रे कष्ट पीक पिकता पिकेना
डोळी दाटलेलं पाणी आता सरता सरेना !


तुझे डोळे आटलेले इथं दाटलेलं पाणी
खपाटीला गेली पोटं माझी पोरं दीनवाणी !


किती पहायची वाट तुझा आगळा रे थाट
गरिबाच्या लेकराची का रे लावशी तू वाट ?


किती करू मी याचना इतकाही नको रुसू
आतुरल्या डोळ्यांमध्ये थोडे फुटू दे रे हसू


नको हिरमुसू देऊ माझं सौभाग्याचं लेणं
पसरते मी पदर.... दे रे एवढंसं देणं !