मी दुसरी - तिसरीत असतानाचा प्रसंग. शाळेत वर्गशिक्षकांनी एक नवीन उपक्रम सुरु केला होता.....दररोज एका विद्यार्थ्याने फळ्यावर नवा सुविचार लिहायचा. त्यामुळे सर्वजण कसून सुविचार शोधायला लागले होते.
त्या दिवशी शनिवार होता. अभिजीत सुविचार व्यवस्थित तयार करुन शाळेत जरा लवकरच आला होता. सकाळची शाळा नेहमीप्रमाणे ७.३० वाजता सुरु होणार होती, त्यामुळे पठठ्या ७ वाजताच शाळेच्या गेटपाशी गेट उघडण्याची वाट पहात होता. जसे गेट उघडले, तसा हा पटकन वर्गात घुसला व दार आतून लावून घेतले. आमच्यासारखी काही ऊत्साही मंडळीही लवकर शाळेत पोहोचली होतीच. पण वर्गात जायचे कसे....दार तर आतून बंद. अभिजीत आत काय करतोय याची भारी उत्सुकता. आम्ही आपला त्याच्या नावाने शिमगा सुरु केला. पण हा पठठ्या काही दार उघडेना.
आमचे तर्क-वितर्क सुरु झाले. फक्त आम्हा काही जणांना आत येऊ दे अशी विनंतीही करुन झाली.....पण कशाचे काय. हा काही दार उघडेना. शेवटी ७.३० वा. प्रार्थनेची वेळ झाली आणि आम्ही सर्वजण त्याला तसेच वर्गात सोडून मैदानात गेलो....पण बाहेरुन कडी लावायला मात्र विसरलो नाही. आता बोंबलायची पाळी ह्याची होती. पण बघायला जवळ कोणीच नव्हते. शाळेत त्यावेळी प्रार्थनेला उपस्थित नसणाऱ्याला अर्धा तास पायाचे अंगठे धरुन उभे राहण्याची शिक्षा होत असे. त्यामुळे अभिजीत जाम उखडला होता आमच्यावर...पण करणार काय बिचारा!.....सुरुवात तर त्यानेच केली होती.
शेवटी एकदाची प्रार्थना संपली. आमचा चंपू दबक्या आवाजात खुदुखुदू हासत वर्गाकडे निघाला. आता बाई (वर्गशिक्षक) येणार म्हणून आभिजीतनेही दरवाजा उघडला आणि सर्वजण आत घुसले. बाईंनीही अभिजीतची खरडपट्टी सुरु केली. आम्ही सर्वजण मिश्किलपणे हसत होतो.....पण तेवढ्यात एकाचे लक्ष फळ्याकडे गेले आणि त्याला आपले हसू आवरता आले नाही. त्याला पाहून बाकीच्यांचेही लक्ष फळ्याकडे गेले आणि आता सर्वजण हसू लागले. प्रथम बाईंना कळेना की काय झालेय....त्या आपल्या अभिजीतला प्रार्थनेला आला नाही म्हणून रागवण्यातच गुंग होत्या. त्यामुळे त्या एकदम खेकसल्या. सगळा वर्ग एकदम चिडीचूप झाला. एकंदर रागरंग पाहून त्यांनीही फळ्याकडे नजर टाकली आणि त्याही आमच्या हसण्यात सामील झाल्या. तेव्हा सर्वांना समजले अभिजीतच्या वर्ग बंद ठेवण्याचे कारण.....
फळ्यावर एक छान सुविचार लिहीला होता आणि त्याखाली दोन सुंदर चित्रे काढलेली होती.....काय होता तो सुविचार...
"चित्रपट पाहून 'देव आनंद' बनण्यापेक्षा, अभ्यास करुन 'विवेकानंद' बना'
आणि आपल्यासारख्या सूज्ञ वाचकांना सांगण्याची गरज नाही की कोणती दोन चित्रे सुविचाराखाली काढली होती अभिजीतने...अहो जात्याच उत्तम चित्रकार होता तो!