मृत्यूचे कटू सत्य सांगणे, वाचणाऱ्याला अस्वस्थ करुन सोडणे किंवा उगाचच लेखनाचा नवीन प्रकार वगैरे शोधण्याचा शिष्टपणा करणे यापैकी मृत्यांगण लिहिण्याचा कोणताही उद्देश नाही. एका प्रेताची आत्मकथा हा भाग या ठिकाणी होऊ शकतो. परंतु मृत्यांगण लिहिण्याचा मूळ उद्देश आहे. इच्छा मरणावर प्रकाशझोत टाकण्याचा. पण या ठिकाणी इंजेक्शन देऊन म्हाताऱ्याला मृत्यू देण्यात आलेला आहे. त्यामुळे इच्छामरण हा प्रकार म्हाताऱ्याच्या बाजूने लागू होत नाही. किंबहुना त्याची अवस्था इतकी वाईट आहे आणि त्याला होणारा त्रास इतका पराकोटीचा आहे की तो त्याला कुठेतरी सहन होत नाहीच परंतु त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांनाही तो सहन होत नाही. बघवत नाही. परंतु समाजातील दृश्य मात्र फारच वेगळे दिसते. म्हातारी माणसं अंथरूणावर खिळली, आणि त्याच्या कितीही जवळचा नातेवाईक असला तरी त्याचे बेडपॅन वगैरे गोष्टी करणे त्याच्या जीवावर येऊ लागते. विशेषत: जेव्हा ही म्हातारी मंडळी जास्त काळ आजारी असतात (अर्थात त्यांचा अंतिम समय जवळ आलेला असतो हे बहुतेकवेळा त्याच्यासह सर्वांना माहित असते) त्यावेळेस ही आजूबाजूच्यांची ही अस्वस्थता जास्तच बघायला मिळते. सर्वच लोकांच्या बाबतील असे होते हे म्हणणे अतिधाडसाचे होईल. त्याला अपवाद असतातच. परंतु केवळ आपल्याला आपला संसार, नोकरी-उद्योग वगैरे दैनंदिन कामे आहेत व म्हाताऱ्यांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही म्हणून आणि म्हाताऱ्यांना आजाराचा त्रास होतोय असे वाटून घेऊन त्यांना डॉक्टरी ( बहुदा नातेवाईक किंवा ओळखीचे डॉक्टर) सल्ल्याने, इंजेक्शन सारख्या उपायांनी अशा व्यक्तिंचे जीवन संपविणे ही एकप्रकारची खूनशी प्रवृत्ती आहे. आणि जेव्हा पोटची मुलेच अशा कृत्याला उद्युक्त होतात तेव्हा त्या दुर्दैवीपणाला काय नाव द्यावे. कायद्यानुसार इच्छामरणाच्या काय व्याख्या आहेत या वादात इथे पडायचे नाही. परंतु एक गोष्ट मात्र मला पूर्णपणे कळते की पाळीव जनावर म्हातारे झाल्यावर खाटकाकडे देणे काय? आणि आईबाप मृत्यूशय्येवर असताना लवकर मरावे म्हणून डॉक्टरी उपाय योजने काय ? यात भयानक स्वार्थी आणि अमानुष वृत्तीच दिसून येते. विशेष म्हणजे समाजात हे घडत असते. घडत आहे. मी काही खंदा, हाडाचा किंवा सिदध हस्त लेखक नाही. मी एक पत्रकार आहे. आणि समाजात जे काही विपर्यास्त चालते ते मांडावे असे मला वाटले आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच. एवढा दीर्घ खूलासा करून आपला वेळ घेतल्याबद्दल मी दिलगीर आहे.
कळावे
आपला मनोगती
पंकज प्र. जोशी
कळावे
आपला मनोगती
पंकज प्र. जोशी
ता.क.: मृत्यांगणमधील म्हाताऱ्याच्या आजारपणाची अवस्था व्हायरल फीव्हरने बऱ्यापैकी दीर्घ आजारी पडल्यावर मी सहन केलेली आहे. आणि या मृत्यांगण उत्पत्तीही त्याच काळातली. शेवटी घरातून आपल्या लोकांकडून नकळत लादले जाणारे मरण व ते आपुलकीचे समजले जाणारे घरच मृत्यांगण होय !