कविता पूर्ण करा

माझ्या वडिलांनी वीस-एक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एका कार्यक्रम पाहिला होता. त्यात एका कवितेची सुरवात करून दिलेली होती आणि श्रोत्यांना ती पूर्ण करायला सांगितले होते. मनोगती कवींना ही कविता दिली तर कशा कशा प्रकारे ती पूर्ण केली जाईल ह्याची उत्सुकता आहे. मी ती कविता ज्या प्रकारे पूर्ण केली आहे ते देखील पुढे देतच आहे, पण ज्यांना ही कवितापूर्ती स्वतः करायची आहे त्यांनी शक्यतोवर मी केलेली पूर्ती आधी पाहू नये म्हणजे पूर्वग्रह टळेल.


अपूर्ण कविता ...


दोस्त आमुचे एक शिकारी भले बहाद्दर मोठे
कथा सांगती खऱ्या त्यातील सगळे वाटे खोटे


म्हणे एकदा निजले असता घरात शिरला वाघ
आवाजाने त्या दोस्तांना आली लक्कन जाग


वाघ पाहतो दोस्तांना अन् ते वाघाला बघती
घडले काय पुढे ते सांगा कविता करून पुरती


 


 


 


 


 


मी केलेली पूर्ती ...


दोस्त गर्जले वाघा का तू मोडलि माझी झोप
थरथर कापत वाघ विनवितो आवरा आपला कोप


संकटात मी, माझी पिल्ले, पत्नी आणि बिचारी
मदत मागण्या तुमची आलो किर्ती तुमची भारी 


खूष होऊनी दोस्त म्हणाले सांगा तुमची व्यथा
हर्षभरित तो वाघ सांगतो भयकारी ती कथा


त्रास देतसे आम्हा सर्वा दुष्ट एक तो ससा
बसला असतो गुहेशीच तो फ़ेंदारुन त्या मिशा


वटारलेले डोळे त्याचे दिसती लालेलाल
सतत वाटते भीती आम्हा करिल काय तो चाल


पिल्ले माझी गोजीरवाणी मटकाविल की काय
अंगणातही ती तर आता टाकत नाहित पाय


सतत वाटते भीती आम्हा स्वप्नातहि तो ससा
अंधारी या चुकवुनि आलो त्याला मी हा असा


केली तुमची झोपमोड मी परत मागतो क्षमा
कृपया त्याला पळवुन लावा मदत करा ही आम्हा


वाघाला त्या मदत कराया गेले आमुचे दोस्त
बसला होता गुहेशीच तो ससादेखिल मदमस्त


काय सांगु मग तुम्हास झाली किती कुस्ति ती जंगी
अंती आमुच्या दोस्तांपुढती ससाच टाकी नांगी


शिक्षा तुजला वनातुनी या हो तु हद्दपार
आलासच का जर तू परतुन तंगड्या तोडिन चार


ऐकताच ते ससा पळाला जंगलातुन त्या पार
हर्षभरित तो वाघ मानितो दोस्तांचे आभार


अशी संपली कथा आमुच्या दोस्तांची ती न्यारी
तुम्हीच ठरवा कशी वाटते खोटी किंवा खरी