राहील नित्य प्रीती- नसेन मीही जगती
देईल नित्य कीर्ती राहील हीच महती ॥
मद क्रोध मोह सारे, कोळून प्राशिले मी
त्यागून सर्व काही उरते तरीही प्रीती ॥
मी कोण काय कुठची? सामान्य एक नारी
घडणे न काही हाती, इच्छिन हेच अंती ॥
रुसवा तुझा फुकाचा, हा खेळ रे क्षणाचा
देऊन सर्व काही, वाढो दिगंत कीर्ती ॥
का रे असा दुरावा? धरीसी मनी अबोला
जणू आज ही सुखाची वाढे अशीच महती ॥
ही प्रीत विश्व व्यापे, सरली अनंत तापे
बदलोनी लक्ष रुपे, उरतेच हीच अंती ॥
देऊन नित्य सारे, धन द्रव्य वा ती माया
परी प्रीत दान करिता, राहील नित्य चढती ॥
ते दिवस सोनियाचे, ते विश्व भावनांचे
ते मेघ रे स्मृतीचे, बघ तरळतात भवती ॥
-संगीता कुलकर्णी