स्वातंत्र्यदिनानिमीत्त..

                   मायभू


गे मातृभूमी देवते, मी नित्य तुला वंदिते
नतमस्तक तव चरणासी, होऊन सदा विनविते ॥


या अखंड पृथ्वीतलावरी, उल्लंघुनि शत सागरी
गेले गिरी वा कंदरी, बस एक आस या उरी
तव दर्शन व्हावे नेत्रा ॥


हा अचल हिमाचल सदा, देतसे अभय प्रेमदा
गंगा यमुना कावेरी, भीमा गोदा नर्मदा ॥


नानाविध इथल्या बोली, नानाविध अंतःकरणे,
नानाविध वेषभूषांची नानाविध इथली वसने
नानाविध समुदायांची नानाविध धर्मकारणे ॥


बहुभाषिक बहुराज्यांची बहुमोल राज्यसंपदा
बहु मंदिर बहु मशीदीतून जयघोष तुझा सर्वदा
बहु असली जरी ही हृदये तरी प्राण तूच गे सुखदा ॥


लाभो अनंत जन्मीचा सहवास तुझा प्रियसा
लाभो असंख्य कार्यास्तव गे स्नेह तुझा मधुरसा
लाभो अनंत गे माये, मृत्तिकास्पर्श अवीटसा ॥


-संगीता कुलकर्णी