कधी कधी मी असतो तेथे नसतो
कधी कधी मी मलाच शोधत बसतो
कधी कधी मी सापडतो मजलाही
कधी मला मी स्वतःच समजुन फसतो...*
कधी कधी मी स्वतःवरच चडफडतो
कधी कधी मी स्वतःमधे गुरफटतो
कधी स्वतःला समजावू बघतो, तर
कधी मनातच उमजुन सगळे हसतो...
कधी कधी मी दिवसा स्वप्ने बघतो
कधी कधी मी रात्री जागत बसतो
कधी कधी मी जुने-जुने आठवतो
कधी, तरी मी, पुनः नव्याने जगतो...
(* हा एक चरण यापूर्वी मुक्तक म्हणून आलेला आहे.)