येणारया जाणारयांच्या...

मान घालुनी खाली मी ही वाट चालतो आहे

येणारया जाणारयांच्या थुंकीस झेलतो आहे


मी माणुस नाही आहे, मज नसे ह्रदय ना छाती

वारयावरती उडणारी मी कुण्याकाळची माती

जगण्याच्या डबक्यामध्ये आजन्म लोळतो आहे


मजला कोठे विचार माझे मांडायाचे होते

कुठे दोस्त हो! तुमच्याशी मज भांडायाचे होते

मी मलाच पुन्हा पुन्हा या शिव्या घालतो आहे




का भांडण मिटवायाचे का सोडवायचा गुंता



ओढच नाही तेथे का मग तुटावयाची चिंता

अवघडलेल्या प्रश्नांना मी असे टाळतो आहे


मी कुठे कविता लिहीतो, मी कधी मारवा गातो

गर्दीत सुरांच्या इथल्या नि:शब्द वावरुन जातो

मी पुन्हा बोलणे नाही - इतुकेच बोलतो आहे...

-------------------- शतानंद