पक्षी व्हावं, नक्षी व्हावं
उमलताना कमलिनी,
रात्रीने साक्षी व्हावं .
साज व्हावं, ताज व्हावं
चंद्रानेही कधीतरी
घुंगराचा आवाज व्हावं .
मूल व्हावं , फ़ूल व्हावं
कवितेनेही वाचता वाचता
शब्दांची झूल व्हावं .
मिठी व्हावं, दिठी व्हावं
राधिकेच्या गीतांनी
मुकुंदाच्या ओठी यावं.
गारा व्हावं , वारा व्हावं
दवाने फ़ुलाच्या
रोमारोमात शहारा व्हावं .
फ़ासा व्हावं, मासा व्हावं
पारध्यानेच कधीतरी
बावरलेला ससा व्हावं .
खेळ व्हावा, मेळ व्हावा
न संपतात तोच
प्रवासाचा वेळ व्हावा.
पूर्ण व्हावं चूर्ण व्हावं
शून्यामध्येच कधीतरी
सारं सम्पूर्ण व्हावं .
नाती व्हावं , गोती व्हावं
पण नश्वर देहाने या
मैतरलेली माती व्हावं .