नदी

माझ्या कवितेत नसतात चंद्र सुर्य तारे,


मी लिहीत नाही फ़ुलांवर पाकळ्यांवर..आणि नदीवर तर नाहीच नाही..


तू नेहेमी विचारतेस मला का असे..?


खरं सांगु..जमीन पाण्याख़ाली गेली .. आणि जाताना माझी स्वप्नही घेऊन गेली..


माझी माय म्हनाली..आपले ग्रह फ़िरलेत.. अन मी आकाशात बघणे सोडून दिले.


बाप तर नदीत पाय टाकुन बसलेला .. अष्टोप्रहर..


मग तुच सांग कसा लिहू मी नदीवर..?


कालच गावाहून छोट्याचं पत्र आलंय..


आम्ही आता कायदेशीर धरणग्रस्त झालो..


आता गावाकडं जातो..वेशीवरच्या मारुतीला मायनं बोललेला नवस फ़ेडतो


बापालाही जरा बरं वाटंल...


आणि बघतो कुठं चिट्कता येतं का ते ... लेटर घेऊन..


मग लिहिन मी..चंद्रावर सुर्यावर ,फ़ुलांवर पाकळ्यांवर


अन कदाचित नदीवरही.....