घननिळी हुरहूर

संध्याकाळ झाली की


मन कसं अलवार होतं


राधेचं ते निळं प्रेम


पुन्हा एकदा हळुवार होतं


येईल का तो पुन्हा


यमुनेच्या काठावर


अजून इथेच उभी आहे मी


जाईल त्याच्या कानावर


आकाशात उगवतीये एक एक चांदणी


हाक कानी येत नाही तरीही,'अगं साजणी'


अशी किती मी गायची


आर्त उदास विराणी


आता आटूनच गेलं


माझ्या डोळ्यातलं पाणी


शब्द ओवून राधिका


लावे डोळ्याला पदर


हर एक संध्याकाळी


दाटे घननिळी हुरहूर