नजरेंत घेऊन हिरवा श्रावण
केंव्हा एकदा आली होतीस
ओंजळीत भरून चांदण्यांचा मोहोर
एकदांच जरा झुकली होतीस
शब्दांची बनवून सोनेरी हरणें
म्हणाली होतीस, 'जाऊ चल दूर;
चंद्र सूर्याचे लावून डोळे
अथांग सागराचा पाहू या ऊर'
मी मात्र होतो 'मातीत' उभा
निराश होऊन तूं गेलीस दूर
धुंडतो वाळूत नांवें आता
डोळां घेऊन अश्रूंचे पूर