विनायकच्या मित्राने इपत्रातून पाठवलेली कविता येथे देत आहे.
ए. सी. ऑफिस, स्वतंत्र केबीन
फटाकडी सेक्रेटरी, दिवसभर मिटिंग्जच मिटिंग्ज
मिटिंग्जमुळे खूप भेटी राहिल्या आहेत
सगळ्या मिटिंग्ज सोडून ज्याला भेटावं
असा लंगोटी यार मात्र हरवला आहे
भरपूर पगार, उदंड सेव्हिंग
मनसोक्त शॉपिंग, सामानाचा ढिगच ढिग
सामानाच्या ढिगाखाली खूप गोष्टी दडल्या आहेत
चूक करून ज्याच्या आड लपाव
असा आईचा पदर मात्र हरवला आहे
हरवला आहे
दिवसाआड पार्टी, कधी पब कधी डिस्क
धुंद रात्र मस्तीची ,प्याल्या प्याल्यातून झिंगच झिंग
चिअर्सच्या चित्कारात खूप आवाज विरून गेले आहेत
ज्या आवानानी हृदयाला साद घालावी
असा आरतीचा गजर मात्र हरवला आहे
हरवला आहे
कारच्या वेगात, सायकलची फेरी हरवली आहे
हॉटेलच्या खाण्यात, फोडणीची पोळी हरवली आहे
तारांकित क्रुझच्या आरामात, पंढरीची वारी हरवली आहे
पिकनिकच्या स्पॉटच्या गर्दीत, मामाचा गाव हरवला आहे
बंद दाराच्या अपार्टमेंटमध्ये, शेजार हरवला आहे
डीजे व्हिजेच्या गोंगाटात, वासुदेवाची मुरली हरवली आहे
साठ फुटी सिमेंटच्या रस्त्यात, वडाची सावली हरवली आहे
कॉन्व्हेंटच्या अट्टाहासात, बाराखडी हरवली आहे
हाय हॅलो थँक युमध्ये, साधीभोळी अनौपचारिकता हरवली आहे
फायद्यातोट्याच्या गणितात, उस्फुर्तता हरवली आहे
निलाजऱ्या रिमिक्समध्ये, निरागसता हरवली आहे
धकाधकीच्या दिनक्रमात, निवांत गप्पा हरवल्या आहेत
सिमेंटच्या जंगलात, माती हरवली आहे
चौकोनी कुटुंबात, नाती हरवली आहेत
आम्ही धावणार करिअरमागे, बाकी कशाची खंत नाही
कशाकशाचा हिशोब मांडू?
ह्या चकचकीत मॉडर्न जगण्यात जिंदगीच हरवली आहे
जिंदगीच हरवली आहे