दिली घेतली वचनं कधी
शब्दापुरतीच फक्त उरतात
घडीभर साथ देऊन कुणी
आयुष्यभर दुरावतात
इथवरच होती सोबत आपली
आता उरलेत काहीच क्षण
सरणाऱ्या या क्षणांना मी
अर्घ्य देतो तुझी आठवण
तू कशी होतीस
खरंच कधी कळलं नाही
होतं नव्हतं सारं संपलंय
बाकी काही उरलं नाही
तू होतीस चंद्र शीतल
मी सूर्याचा दाहक अंश
चंद्रासाठी सूर्याने पण
कक्षा कधी सोडली नाही
मला प्रिय मावळता पश्चिमा
तुला मोहवी पूर्वेची उषा
तुझं माझं आयुष्य हे
न छेदणाऱ्या समांतर रेषा
तुझं जग खरंच वेगळंय
भावना तिथे मातीमोल
कळणार तरी कसे तुला
माझे अबोलीचे बोल
कधी ऊन कधी पाऊस
कधी एकाकी रातीचे
जीवन माझे समईच्या
मालवत्या वांतीचे
गेलेल्या काळाने
मनंच माझं सोबत नेलंय
त्रयस्थासारखं जगत राहणं
हेच माझ्या हाती उरलंय
पहाटेचे दुस्वप्न सारे
स्वप्न कसले ही एक व्यथा
कथा सरते मागे उरते
थोडी आठवण, थोडी व्यथा
आठवणी या जणू भासती
जखमा खोल रुजलेल्या
सारं काही गमावूनही
माझ्यासाठी उरलेल्या
काळ सरेल, काळाबरोबर
आठवण तुझी पुसट होईल
मनात मात्र खोल कुठेतरी
सल मात्र कायम राहील
चार घडीचा सोहळा सारा
मागाहून मग उरतंच काय?
अळवावरचं पाणी सारं
जीवन याहूनी असतंच काय?
- राजेश