मुन्नाभाई पाहिला अन नशिब माझे फ़ुटले
बायको पासुन बॉसपर्यंत सारे गणित चुकले
दुस-याच दिवशी बायकोने पाकिट माझे मारले
बससाठी तिच्याकडुन दहा रुपए उसने मागितले
निषेध म्हणुन मी मग मौनव्रत पाळले
जेवतानाही फ़क्त खाल्ले भात आणि पिठले
लोकलमधे सुद्धा व्रत कष्टाने मी सांभाळले
हजार धक्के खाउन सुद्धा तोंड नाही उघडले
खात होतो शिव्या तरी बोलत नव्हतो उलटुन
सगळ्या मित्रांनी मजा घेतली आलटुन पालटुन
ऑफ़िसातली फ़टाकडी नेहेमी माझ्या जवळ येते
सगळ्यांना मी सांगितले ती आई सारखी दिसते
माझ्या वागण्यात बदल पाहुन बहुतेक देव जळु लागला
शाप म्हणुन माझ्या कपाळावर त्याने एक आरसा लावला
आरसा होता भारी, अंधारातही चमकायचा
मनामधलं नेमक समोरच्याला दाखवायचा
सगळ्यात आधी मार खाल्ला बायकोच्याच हातचा
जवळ ती होती पण आरशात फ़ोटो शेजारणीचा
बॉसला नेमका कसा आरशात गेंडा दिसला
हात धरुन प्रेमाने त्याने घरचा रस्ता दाखवला
मित्राला तर आरशात दिसला साप आणि कोल्हा
नेत्यासमोर आरशात दिसला भला मोठा कुत्रा
सरकारी ऑफ़िसात दिसले सगळ्याना काळे कावळे
भ्रष्टाचाराच्या चिखलात नाचणारे वरुन पांढरे बगळे
गांधीगीरीचा प्रयत्न मला चांगलाच भोवला
जाता येता सगळ्यांकडुन रग्गड मार खाल्ला
झक्कत गेलो देवाकडे म्हटलं बाबा सोडव
गांधीगीरीचं खुळ माझं तुच आता उतरव
देव तेव्हा खुष झाला गालात हसुन बोलला
एकच महात्मा मी कष्टाने जन्माला घातला
त्याचीच होती ताकद गांधी म्हणुन जगण्याची
त्याचीच होती लायकी गांधीगीरी करण्याची
ऑफ़िस आणि घर एवढच तुमच जग
चार भिंती एक छप्पर एवढच तुमचं घर
गांधीगीरी करायची तर मन तसं कर
देवाला म्हटलं बाबा चुक झाली मला माफ़ कर
सोडुन दीली गांधीगीरी गायब झाला आरसा
पुन्हा वागु लागलो मी सामान्य माणसासारखा
तेव्हापासुन आजपर्यंत मी सुखात जगतोय
पोटात असतं एक तरी तोंडाने दुसरच बोलतोय