काही सुचतंच नाहीये आज
काय होतंय काही कळतंच नाहीये आज
सगळ्यांमधे असूनही वाटतंय एकटं का
सारे जवळ असूनही ही हुरहुर कां
काहीतरी तुटतंय हा भास कां
हातून काहीतरी निसटतंय हा आभास कां
कशात रमवावं मन हे खुळं
मनाचं हे वागणं कां नेहमीपेक्षा निराळं
कशामुळे आलंय हे मळभ आकाशात
त्याचीच तर सावली नव्हे ना अंतरात
सारंच भासतंय करुण अन् उदास
हट्टी जीवाची ही कसली मिजास
पुरे झाला आता हा खुळचट खेळ
वेडावतेय तुला ही रम्य सांजवेळ
देवापुढची समई शांत, प्रसन्न हसतेय
अजूनही निराशा ही मग का घर करतेय
बघ त्या ज्योतीकडे डोळे एकदा भरुन
हृदयातला अंध:कार कधीच गेलाय पळून
आता स्वच्छ, नितळ मनाच्या गाभाऱ्यात
होऊ दे एका नव्या दिवसाची सुरवात.....
जयश्री