हि कथा मी ११-१२ वर्षाची असताना, टी.व्ही वरील एक मालिकेमध्ये पाहिली होती. खूप आवडली होती मला ती. आता ती पूर्ण आठवत नाही, फक्त कथेचा मुद्दा आठवतो आहे. तेव्हा गाभा तोच ठेवून, थोडीफार माझी कल्पनाशक्ती वापरून हि कथा मनोगतींसमोर ठेवत आहे. आवडल्यास लेखकाला(???) श्रेय द्यावे. काही चूक झाल्यास मोठ्या मनाने पोटात घ्यावी. कथेची रंगत वाढविण्यासाठी काही इंग्रजी शब्दांचा वापर करत आहे.
राज सरपोतदार.. एक हुशार, स्मार्ट आणि हाडाचा सिव्हिल इंजिनियर. हाडाचा अशासाठी म्हटलं, कारण सिव्हिल इंजिनियरिंग त्याच्या रक्तातच होतं. डी. के. सरपोतदारांचा हा एकुलता एक मुलगा. 'आकाशगंगा बिल्डर्स' या त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये २ वर्षांपासून कामावर रुजू झालेला. डी.कें चा व्याप खूप मोठा होता. शहरातच नव्हे, तर भारतातल्या सगळ्याच मोठ्या शहरांत डी.कें नी खूप नाव मिळवले होते. डी.के. अतिशय प्रॅक्टिकल होते. त्यांच्या ठिकाणी प्रेम, माया, आपुलकी हे म्हणजे केवळ पुस्तकात शोभून दिसणारे शब्द. माणसाने फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा, मोठी महत्त्वाकांक्षा बाळगावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नात्याचाही विचार करू नये.. जगात पैशाशिवाय मोठे काहीही नाही, असे त्यांचे ठाम मत. राज मात्र मृदू, कोमल मनाचा. स्वतःच्या आणि दुसऱ्याचा भावना जपणारा. सुवर्णाताईंप्रमाणे (राज ची आई) त्याला लोकांना भेटणे, त्यांना घरी बोलावणे, त्यांच्यात मिसळणे यांत काही चुकीचे आहे असे वाटत नसे. त्यामुळे, घरी बऱ्याच वेळेला आई-मुलगा विरूद्द्ध वडील अशी वादावादी होत असे. आणि शेवट "पैसाजवळ असेल तर तुम्ही वाट्टेल ते सुखच काय पण माणसेही विकत घेऊ शकता" या डी.कें च्या वाक्याने होत असे. तर असं हे त्रिकोणी कुटुंब.
शाल्वी. एक हुशार, सालस मध्यमवर्गीय मुलगी. राजची कॉलेजमधली मैत्रीण. दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र. राजचे शाल्वीवर प्रेम आहे. पण मैत्री तुटेल या विचाराने त्याने कधी ते तिच्यापाशी व्यक्त केले नाही. कॉलेज शिक्षण संपल्यावर शाल्वीने, G.R.E. देऊन स्कॉलरशिप मिळवली. स्पेशलायझेशन साठी तिने लंडन युनिव्हर्सिटीत ऍप्लिकेशन केले. आणि तिला तिथे ऍडमिशन मिळाली.
लंडन मधील अभ्यासक्रम पूर्ण करून शाल्वीने तिथल्याच एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरी मिळवली. कामावर रुजू होण्यापूर्वी २ आठवड्यांची परवानगी काढून शाल्वी भारतात आली. भारतात आल्याबरोबर तिने राजला फोन केला.
"शाल्वी, what a pleasnt surprise?? कधी आलीस? कुठे आहेस? केव्हा भेटतेस?"- राज.
"अरे.ऽरे.. हो! जरा श्वास घेना मध्ये. किती प्रश्न विचारशील एकदम? .. कालच आले. अरे मला ना तिथल्याच पी. जी. कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनी मध्ये नोकरी मिळाली आहे. फक्त २ आठवड्यांच्या सुट्टीवर आले आहे."- शाल्वी.
"काय? फक्त २ च आठवडे?" राज थोडा हिरमुसला.
"हो, रे, म्हटले, जॉईन होण्याआधी इकडे येऊन जावे. नंतर कामाच्या व्यापातून कधी सवड मिळेल माहीत नाही."- शाल्वी.
"आज संध्याकाळी भेटू कॉलेज जवळच्या 'मधुसूदन' मध्ये. मग बोलू भरपूर. ठीक आहे?"- राज.
"हो, चालेल, ठीक ५ वाजता येते मी."- शाल्वी.
"ओ.के. बाय." म्हणत राजने फोन बंद केला खरा पण त्याच्या मनात असंख्य वादळे निर्माण झाली. त्याच विचारात तो ऑफिसला जाण्यासाठी निघाला. इतक्यात,
"राज..."- सुवर्णाताईंची हाक ऐकू आली. राजच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्या म्हणाल्या, "काय रे? मोबाईलवर कोणाशी बोलत होतास?"
"नाही गं. कोणाशीही नाही."- राज.
"खरं का?"- सुवर्णाताई.
"अगं, गुप्त्यांचा फोन होता. साईटवर बोलावले आहे." राज आईची नजर चुकवत बोलला.
"राऽज, काय झालंय?" सुवर्णाताई त्याचा चेहरा ओंजळीत धरत म्हणाल्या.
"आई, शाल्वी आली आहे लंडनहून." -राज गंभीर झाला.
"काय? अरे, मग आता लवकरात लवकर तिला मागणी घाल बरं. आता जास्ती उशीर करू नको." -सुवर्णाताई.
"आई, ती फक्त २ आठवड्यांसाठी आली आहे. ती लगेचच परत जाणार आहे. आज संध्याकाळी आम्ही कॉलेज जवळ भेटणार आहोत." -राज
"मग तर तू घाईच कर. आजचं विचार तिला."--सुवर्णाताई.
"मला भिती वाटते, ती नाही म्हणाली तर? कदाचित बोलणे बंद करेल."--राज
"मी बोलू का तिच्याशी... मी तिला......"--सुवर्णाताई
"अगं जरी ती 'हो' म्हणाली, तरी बाबांचं काय? त्यांना नको पटायला?" -राज
"हो रे. पण तरी, मी एकदा तिच्याशी बोलून बघू का?" --सुवर्णाताई.
"नको. मी बघतो काय करायचं ते." -राज
राज ऑफिसला निघून गेला. सुवर्णाताईंनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून एक सुस्कारा टाकला.
दिवसभर तो संध्याकाळची वाट पाहत होता. पण या सगळ्याचा त्याने कामावर मात्र परिणाम होऊ दिला नव्हता. संध्याकाळी ४.३० वाजता डी.केंच्या केबिनमध्ये जाऊन त्याने आपण थोडे लवकर जात असल्याचे सांगितले.
"काही.... खास कारण??" --डी.के.
"हो. खासंच आहे... माझ्या दृष्टीने." - राज.
"ओ.के. म्हणजे... नक्कीच कोणालातरी भेटायला जायचे असणार... isn't it?" - डी.के.
"येस. " - राज.
"विचारू शकतो.. कोणाला?" - डी.के.
"एका मित्राला"..- राज. शाल्वी चे नाव घेतले तर डी.के. इथेच वादावादी सुरू करतील म्हणून राजने खोटेच सांगितले. आणि तो तिथून बाकी काहीही न बोलता बाहेर पडला आणि कॉलेज जवळच्या 'मधुसूदन' मध्ये आला.
पुढचा भाग लवकरच...