मूल म्हणतं

मूल म्हणतं खेळू दे, रानामध्ये पळू दे


काटा लागताच पायाला, दोन टिपं गळू दे.


मूल म्हणतं भिजू दे, थयथय पाण्यात नाचू दे


देवाजीचे मोती झेलून, नाकात शेंबूड साचू दे.


मूल म्हणतं भांडू दे, गोळ्यांचा डबा सांडू दे


रुसून फुगून मोडलेला, डाव पुन्हा मांडू दे.


मूल म्हणतं - "माऊ ये, बेडकामागे धावू ये,


दांडी मारू शाळेला, गेला नंबर तर जाऊ दे!"


----------


"एवढं मात्र बोलू नकोस, शाळेला जाणं टाळू नकोस"


आई मग समजूत काढते, "उद्या चित्रं आणू" म्हणते.


आई मग समजूत काढते...


     चित्रामध्ये गुलाब असेल,


     गुलाबाला काटा असेल,


     काटा तुझ्या बोटात रुतेल,


     डोळ्यातून पाऊस पडेल,


     पावसाचं गाणं गाऊ, खिडकीआडून पाऊस पाहू


------


मूल म्हणतं... मूल रडतं...


एक खोटं आयुष्य घडतं.