कॅस आला रे आला

(माझी ही कथा १२ सप्टेंबर २००३ च्या 'लोकसत्ता' - 'हास्यरंग' पुरवणीत प्रकाशित झाली होती. आता मुंबई - दिल्लीत कॅस येऊ घातलाय, त्यानिमित्तानं काही संदर्भ काळाप्रमाणे बदलून, मनोगतींसाठी पुन: प्रकाशित करतोय.)


'कॅस आला रे आला' अशी पुन: एकदा बातमी (का अफवा?) आली. लगेच आमच्या इमारतीतल्या सूचना-फलकावर एक सूचना लागली - 'कॅसबद्दल चर्चेसाठी आज रात्री सभा'. हा मथळा देणाऱ्याचं मला कौतुक करावंसं वाटलं, कारण यापूर्वीही एकदा हीच सूचना मी पाहिली होती. जशी कॅसची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली, तशी ती सूचनाही काढून टाकण्यात (नव्हे, जपून ठेवण्यात) आली!


सकाळी कार्यालयात जाताना पाहिलेली सूचना संध्याकाळीही फलकावर तशीच होती. त्यामुळे तो 'आज' आजच याची खात्री पटली. सभेच्या वेळेचा मात्र कुणालाच पत्ता नव्हता! आमचे कार्यवाह (सेक्रेटरी) परुळेकर मामा माझ्या शेजारीच राहतात. ते म्हणाले, "आठपर्यंत सगळे घरी येतात. साडेआठला सुरू करू सभा. वरच्या मजल्यावरच्या लोकांना तू बोलव, खालच्यांना मी बोलावतो". मामांनी लगेच कामाची वाटणी केली.


मी भुजबळांना फोन लावला. "नमस्कार! साडेआठला या खाली", मी. भुजबळांचा आवाज आलाच नाही. मात्र मागून त्यांच्या सौं. चा आवाज (टी. व्ही. च्या वाढलेल्या आवाजासह ऐकू आला, "काय माणसं आहेत! जाहिराती लागल्यावर का नाही फोन करत?" मी समोर बघितलं. आमच्या टी. व्ही. वर जाहिरातीच चालू होत्या. फक्त चॅनेल वेगळा होता. भुजबळांकडे बहुधा 'या सुखांनो या' चालू होतं. अर्थात, भुजबळ तसा चांगला माणूस. थोड्याच वेळात त्यांचा फोन आला, "वादळवाट झाल्यावर ठेवू सभा". (आता मला सभेची आजही 'अधुरी एक कहाणी' होणार नाही याची खात्री वाटायला लागली.) "दोशीला विचारा चालेल का? लवकर जेवतो तो." मी भुजबळांना कामाला लावलं आणि तिसऱ्या मजल्यावरच्या शर्माला (दोशीचा शेजारी) फोन लावला. "अंकल, अभी किधर मीटिंग? अभी तो टेस्ट मॅच चल रहा है और स्मिथ अच्छा खेल रहा है. फोर रन्स!" शेवटचे दोन शब्द तो फोन खाली ठेवतानाचे होते. एक तर माझ्यापेक्षा फक्त चार-पाच वर्षांनी लहान असूनही हा मला नेहमी अंकल म्हणतो. दुसरं म्हणजे अगदी साउथ आफ्रिकेची फलंदाजीही सोडत नाही!


अखेर सभेसाठी आम्ही मामांच्या घरी जमलो. वास्तविक कॅसबद्दल चर्चा करण्यासारखं काय आहे हे तोपर्यंत मला कळलं नव्हतं. माझ्या मते हा पूर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न होता. ज्याला पाहिजे त्यानं तो 'सेट टॉप बॉक्स' घ्यावा विकत! "इथेच चुकता तुम्ही", मामा कोड्यात बोलले. "कॅसमुळे आपल्याला प्रत्येकाला भुर्दंड पडणार आहे, हे तर खरंच आहे. एक खर्च त्या बॉक्सचा आहे; पण दुसरा खर्च प्रत्येक चॅनेल / ग्रुपची फी दरमहा भरण्याचा." पुरेसा श्रोतृवृंद जमल्याची खात्री करून  मामा पुढे म्हणाले, "हा दुसरा खर्च आपण कमी करू शकू - सहकार तत्त्वामुळे!"


कोकणातले मामा मग सहकारासाठी थोडा वेळ देशावर भटकले. साखर कारखाने, सूत गिरण्या इत्यादी विषयांनंतर गाडी पुन्हा 'कॅस'वर आली. "आपण सर्वांनी ही चॅनेल्स किंवा ग्रुप्स शेअर करायचे. म्हणजे एका घरात फक्त 'झी' ची चॅनेल्स, तर दुसऱ्या घरात फक्त 'सोनी'. तिसऱ्याकडं 'स्टार' तर चौथ्याकडे 'खेळ'. आपल्यापैकी कितीतरी लोक एकच कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी बसून  बघतात. तो एकाच ठिकाणी बसून बघायचा!"


"चालेल! माझ्याकडे मी सगळे 'फ्री चॅनेल्स' दाखवेन." तळमजल्यावरचा चाफेकर!


मामा म्हणाले, "थांबा. तोही विचार मी केला आहे. आपली योजना सर्वांनाच स्वस्तात टी. व्ही. बघायला मिळावा यासाठी आहे, त्यात एकाला अधिक आणि दुसऱ्याला कमी खर्च करायला लागू नये." मामांची गाडी आता साम्यवादाकडे वळणार की काय अशी भीती आता मला वाटायला लागली; पण तेवढ्यात दोशीचा "साडे नौ बज गए" असा इशारा आला. भुजबळांनीही "हो. हो. उशीर होतोय, मामा तुम्ही बोला पुढे" असं म्हणून दोशीला दुजोरा दिला!


"आपलं सगळ्यांचं मासिक भाडं सोसायटी भरेल. ते आपण वाटून घ्यायचं. म्हणजे आपल्या एकूण सोळा घरांमागे पाच-सहा चॅनेल-ग्रुप्सचे पैसे प्रत्येकानं भरण्याऐवजी एकदाच भरावे लागतील. आपलं मासिक भाडं दोन-अडीचशेच्या वर जाण्याऐवजी शंभरच्या आत येईल!" असं म्हणून मामांनी चक्क शेजारच्या संगणकावर पॉवर-पॉइंटच्या वेगवेगळी गणितं मांडलेल्या दोन स्लाइड्स दाखवल्या!


कल्पना चांगली वाटली तरी प्रत्यक्षात गैरसोय नाही का होणार लोकांची? मी शंका बोलून दाखवली; पण मामांचं पूर्वायुष्या विमा-एजंट म्हणून गेलेलं असल्यामुळे कुठलीही पॉलिसी ते लोकांच्या गळी उतरवू शकत होते. बहुमतानं ठराव संमत झाला. इतका वेळ शांत असलेल्या शर्मानं आता तोंड उघडलं, "अंकल, ड्रेस रिहर्सल रखेंगे". हो-ना करत हाही प्रस्ताव मंजूर झाला. रंगीत तालीम म्हणजे एका घरी एकच चॅनेल बघायला मिळणार असं समजायचं. ज्याला जो चॅनेल बघायचा आहे, त्यानं त्या ठराविक घरी जाऊन तो बघायचा! मग एक तक्ता तयार करण्यात आला -
१) दोशी - स्टार
२) भुजबळ - झी (मराठी)
३) शर्मा - खेळ
४) परुळेकर - कार्टून नेटवर्क
५) चाफेकर - सोनी
आम्हां इतर मंडळींमधेही न्यूज, झी, ई, इ. चॅनेल्स वाटून देण्यात आली.


...... रंगीत तालमीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इमारतीत काहीशी विचित्र परिस्थिती होती. परुळेकर मामांच्या दिवाणखान्याचा पूर्ण नकाशा बदललेला होता. शिवाय घरातला सगळा खाऊ एका दिवसात संपला अशी तक्रार मामी करत होत्या. दोशीकडे सतत स्टार प्लस चालू असतं, स्टार गोल्डसाठी अजून एक जोडणी लागेल असं मिसेस शर्मा म्हणत होत्या. 'सेट मॅक्स' वर चित्रपटही लागतात आणि कधी कधी क्रिकेटचे सामनेही! "मग माझ्या घरी लोक जास्त वेळ मुक्काम करतील", असं चाफेकरचं मत पडलं. दोशीच्या घरी (त्याच्या बायकोला त्रास होऊन नये म्हणून) भुजबळ ताट घर्रूनच वाढून घेऊन गेले, मात्र तो शाकाहारी आहे हे विसरून. त्यांच्या ताटातलं मटण बघून सौ. दोशींचा पापड झाला!


...... थोडक्यात, रंगीत तालीम हाच अखेरचा प्रयोग ठरला!


मी आणि मामा त्यांच्या बाल्कनीत उभे होतो. त्यांच्या चेहऱ्यावर 'म्हातारी मेल्याचं दु:ख नाही..' असे काहीसे भाव होते. ते म्हणाले, "कॅस म्हणजे काय रे - 'कंडिशनल ऍक्सेस सिस्टीम'च ना? जाऊ दे. हेल्मेटची सक्ती, गाड्यांच्या नंबर प्लेट्स काळ्याच्या पांढऱ्या करणं आणि आता कॅस - या सगळ्याचा फटका शेवटी आपल्यालाच बसणार. या छोट्या सिस्टीमच्या वरची मोठी सिस्टीम जोवर बदलत नाही, तोवर हे असंच चालणार! दुसरं काय?"


- कुमार जावडेकर, मुंबई