समर्पण....

हि कविता माझी आई सौ. मंजुश्री गोखले हिची आहे. तिची अनुमती घेऊन ही कविता मनोगतींसमोर ठेवत आहे....


 


प्रेम कर मेघासारखं, पावसाच्या सरीवर


प्रेम कर राधेसारखं, कृष्णाच्या बासरीवर.


प्रेम कर गरीबासारखं चतकोर भाकरीवर,


प्रेम कर कुंभारासारखं मातीच्या खापरीवर.


प्रेम कर योध्यासारखं जखमांच्या वणावर,


प्रेम कर फुलासारखं सुगंधी क्षणावर.


प्रेम कर शेतातल्या मातीच्या कणावर,


प्रेम कर घामाने भिजलेल्या घणावर.


प्रेम कर मानवतेच्या दुर्मिळ दर्शनावर,


प्रेम कर राखलेल्या विश्वासू वचनावर.


प्रेम कर वात्सल्याच्या अनूभूत प्राशनावर,


प्रेम कर कृष्णाच्या फिरत्या सुदर्शनावर.


प्रेम कर उधाणलेल्या सागराच्या लाटेवर,


प्रेम कर भूपाळीच्या सुंदर पहाटेवर.


प्रेम कर रुणझुणत्या ओल्या पाऊलवाटेवर,


प्रेम कर सावळ्याच्या पायाखालच्या विटेवर.


प्रेम कर असं झोकून, स्वतःला घे जाळून


ही जळती अग्नीफुलं डोईवर तू घे माळून.


 


- प्राजु


कवयित्री : सौ. मंजुश्री गोखले.


काव्य संग्रह : शिशिरसांज.