आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय
स्वप्न माझ्या डोळ्यांचं तुझ्या डोळ्यांना सांगायचंय
तुझं वळण आयुष्याला अगदी अलगद आलं
एका क्षणात सारं माझं जीवन बदलून गेलं
त्या साऱ्या क्षणांना फुलांसारखं जपायचंय
आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय
शब्द शब्द साठवून साऱ्या भावनांना बद्ध केलं
तुझ्या ओठावरती त्याच सुरेल गीत झालं
तुझ्या सुरात जीवनाचं गाणं मला गायचंय
आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय
झुकलेले डोळे तुझे मिलनाला आतूर झालेत
क्षितिजाचे रंग तुझ्या गालांना फितूर झालेत
तुझ्या साऱ्या रंगात आज मला रंगायचंय
आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय
माझ्या सप्तसुरांना आज तुझी साथ हवीय
समेवरती आज मला फक्त तुझी दाद हवीय
तुझ्या सरगमी श्वासांना आज मला छेडायचंय
आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचंय
-अनिरुद्ध अभ्यंकर