कथा गर्दीची

न चुकता वाजणारा गजर आजही वाजला. सकाळचे सहा वाजत होते. पाच मिनीटांनची डुलकी गेल्याच आठवड्यात लेटमार्क देऊन गेली होती. बाप रे! नकोच ती आठवण सकाळी सकाळी असे म्हणत शमा उठली. सात वाजेतो लेकाला उठवून, लाडीगोडी लावीत कसेबसे आवरून शाळेत पाठविले. तो आनंदाने जाणे तिच्या दिवसभराच्या मन:शांतीसाठी गरजेचे होते. नवऱ्याला उठवून चहा देत ती एक डोळा घड्याळाकडे ठेवीत भराभर कामे आवरत होती. आठ-वीस ला ती दोघेही बाहेर पडली. चला आज वेळेवर ऑफिसला पोहचणार ह्याची खाञी पटली. रिक्शा करून स्टेशन गाठलें. एक कान अनाँन्समेंटकडे ठेवीत ब्रीज चढताना तिच्या लक्शात आले की काहीतरी गडबड दिसतेय. तेवढयांत एक लोकल आली. चला सुटले. ऊगाच घाबरलो आपण. दुसऱ्यांच क्षणी हे सुख हिसकून घेतले त्या अनॉन्सरच्या दिलगिरीच्या शब्दांनी. ती लोकल तिन तास उशिरा अवतरली होती. सगळ्यां प्लॅटफॉर्मस वरची गर्दी पाहून तिच्या आनंदाचे बारा वाजलेच होते, किमान बारा वाजेतो तरी पोहोचता आले तर बरे होईल असे मनाशी म्हणत ती चार नंबरवर उतरली. प्रत्येकवेळी तेवढयाच हिरिरीने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नांना अखेरीस यश येउन रडतखडत एक वाजता सेक्शन मध्ये पोहोचली. युद्ध खेळल्यामुळे सकाळच्या छान आवरण्याचा पुरता अवतार झाला होता. सेक्शनमध्ये मधोमध साहेब उभे होते. माझ्या आधी पाच/दहा मिनीटांच्या फरकानी इतर कलिग्ज येऊन पोहोचले होते. साहेब त्या सगळ्यांनची चंपी करित होते. हाणामारी करून कसेबसे येऊन टेकलेल्या साऱ्यांना जाम वैताग आला होता. मला पाहताच सगळयांनी हिला विचारा म्हणत कल्ला केला. साहेबांचा माझ्यावर अमंळ जास्तच विश्वास आहे, असा बऱ्याच जणांचा गोड गैरसमज होता आणि असुयापण. साहेबांचा मोहरा माझ्याकडे वळताच अभावितपणे माझ्या तोंडून गेले, तर काय! इतकी गर्दी होती की माझे डोळेसूद्धा चेंगरले. दोन मिनीटे भीषण शांतता पसरली आणि एकदम सगळे जोरजोरात हसू लागले. साहेबांनी धन्य आहात असे हातवारे करित सगळ्यांना मस्टर दिले आणि चहा मागविला. पहा बाई, खरे बोलले तर .........