पुनर्वसन... !
निद्रिस्त मी अताशा , पुनव- भ्रमण व्हायचे आहे...
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे...!
मज नको सखे जागृती ही,
स्वप्नांचा गांव उजाड...
त्या गांवाचे अजुनही पुनर्वसन व्हायचे आहे ...!
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे... १
तो गांव पुन्हा बहरेल,
सर उन्हातही बरसेल ...
मस्तिष्कावर मनाचे अतिक्रमण व्हायचे आहे...
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे...२
ग्लानींत रंग बघ भरले,
गांवास प्रीतिचे आता ...
ग्लानीस जागृतीचे संस्मरण व्हायचे आहे...
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे...३
अताशा कुठे भिडली ,
नजर तुझी नजरेला...
जाणून आर्जव माझे, तीज चरण व्हायचे आहे...
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे ...४
तव कुंतल-छाया गर्द,
गांवाच्या नशिबी माझ्या ...
स्वप्नांत तुझे नि माझे जागरण व्हायचे आहे ...
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे... ५
अजुनही सुगंधित आहे ,
ही वेस चंदन कवळे ...
यौवनाचा कैफ़ अजून, त्या सरण व्हायचे आहे...
वास्तवावर अंतरीचे आक्रमण व्हायचे आहे ...६
" तू नको रमू रे सखया
नसलेल्या त्या गावी...
वास्तवासचा गांवां अंती शरण जायचे आहे...
सर्वस्वावर त्याचे आक्रमण व्हायचे आहे..." ७
अनिरुद्ध राजदेरकर