बोलका ढलपा (पूर्वार्ध)

एक वैद्यबुवा आपल्या वनौषधी बनवण्यासाठी लागणारी पाने, फुले, कंदमुळे वगैरे गोळा करण्यासाठी अधून मधून रानावनात दूरवर जात असत. कधी कधी रानात राहणारा एक चुणचुणीत मुलगा त्यांना मदत करायला त्यांच्याबरोबर असायचा. रानातील वेगवेगळी ठिकाणे दाखवणे, झाडावर चढून उंचावरील पाने, फुले, फळे तोडून आणणे, त्यांच्यासाठी घरून जेवण आणि पाणी घेऊन येणे अशा अनेक कामामध्ये तो त्यांना मदत करीत असे.

एके दिवशी दूरवरच्या एका डोंगरावर चढून गेल्यावर त्यांना एक उपयुक्त वनस्पती तेथे उगवलेली दिसली, तिची कोवळी पाने खुडण्यासाठी लागणारे एक विशिष्ट प्रकारचे छोटे हत्यार त्यांच्या घरी होते पण त्यांनी या वेळेस बरोबर आणलेले नव्हते. तेवढ्यासाठी घरी जाऊन येण्यात तो दिवस वाया गेला असता. "त्यांनी आता काय करायला हवे?" हा प्रश्न मी वेगवेगळ्या लोकांना विचारला आणि त्याची निरनिराळी उत्तरे मिळाली.
एका बालगटातील मुलाने सांगितले, "अगदी सोप्पं आहे. रानात राहणाऱ्या वनराणीला बोलावून सांगायचं की मला ते हत्यार हवं आहे. ती लगेच आपली जादूची कांडी फिरवेल आणि ते आणून देईल."
एका विशीतल्या मुलाने सांगितले, "त्यात काय आहे? बाईकला किक मारायची आणि काय पाहिजे ते घेऊन यायचे."
त्याच वयाच्या मुलीने सांगितले, "मी त्याच्या जागी असते ना, तर सेलवर बायकोशी बोलले असते आणि ते आणायला कुणाला तरी घरी पाठवून दिले असते."
चाळीशीतल्या माणसाने सांगितले, "तो मुलगा बरोबर आहे ना ? त्याला घरी पाठवून दिले की झाले."
"पण त्या हत्याराला काय म्हणतात हे तो विसरून गेला तर?"
"ठीक आहे. वैद्यबुवांनी आपल्या बायकोच्या नांवाने एक चिठ्ठी लिहून द्यायची."

या गोष्टीचा कालखंड मी मुद्दामच सांगितला नव्हता. पण तो इतका जुना होता की त्या काळात साधे पेन, पेन्सिल आणि कागद उपलब्ध नव्हते. तर सेल आणि बाईक कोठून असणार? त्या वनवासी बालकाला तर साक्षरता म्हणजे काय याचीसुद्धा मुळीच कल्पना नव्हती. तेंव्हा त्या वैद्यराजांनी काय केले असेल? त्यांनी एक लाकडाचा छोटासा ढलपा काढला आणि बाभळीच्या काट्याने त्या ढलप्यावर हत्याराचे नांव कोरून तो त्या मुलाला दिला आणि सांगितलं, "हा ढलपा वाटेत कुठे न हरवता माझ्या बायकोला नेऊन दे आणि जेवणाबरोबर ती आणखी एक वस्तू तुला देईल ती सांभाळून इथे घेऊन ये."
त्याप्रमाणे तो घरी जाऊन ते हत्यार घेऊन आला. मुलगा निरक्षर असला तरी डोक्याने तल्लख होता. त्यामुळे  वैद्याला नेमके काय पाहिजे ते त्याच्या बायकोला कसे समजले हा गहन प्रश्न त्याला पडला. त्याने धीर करून तो प्रश्न वैद्याला विचारला सुद्धा. वैद्याने उत्तर दिले, "अरे मी तुला एक लाकडाचा ढलपा दिला होता ना? तो तिच्याशी बोलला."
त्याचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, "तो हातात धरून मी तुमच्या घरी गेलो तेंव्हा माझ्यासंगट तो कांही नाही बोलला."  वैद्याने सांगितले, "तुला खरं वाटत नाही कां? आता तू माझ्याबरोबर पुन्हा आमच्या घरी चल. वाटलं तर तू माझ्या आधी पुढे जा. आपण घरी जाऊ तेंव्हा तूच माझ्या बायकोला विचारून घे."
घरी गेल्यावर लगेच त्या मुलाने वैद्याच्या बायकोला विचारले, "कांहो, आपल्या वैद्यबुवांना रानात काय पायजेल होतं ते तुमाला घरी बसल्या कसं कळलं?"
"अरे तू तो ढलपा आणून दिला नव्हतास कां? त्याच्याकडून समजलं."
"त्यो ढलपा कसा बोलतो ते मला बी बगू द्या की. कुटं हाय त्यो?"
"अरे त्याचं काम झालं म्हणून बंबात टाकला मी तो जाळायला." बाई म्हणाल्या.
"आरं द्येवा, मला तो पहायचा होता ना! त्यासाठी मी इथपत्तूर आलो. आता असला ढलपा पुन्यांदा कुटं मिळंल?" मुलगा रडायला लागला.