ढग

वैशाखास भिजल्या धरेने विसरू नये

पुढल्या पावसाला कधी गृहित धरू नये

ढग जाईल रुसून नव्या क्षेत्रा सिंचण्या

कोंबावर ढगाहून माया पखरू नये

चंचल जलद सारे, कधी इथे कधी तिथे

वसुधे, भ्रमरचित्तांवरी प्रेम करू नये

माळी एकटा तू न बागेत न जीवनी

तू नसशील तेव्हा फुलांनी बहरू नये ?

'मृण्मयी', निरुपयोगी ढगांची शुष्क चारुता

प्रीती सावळ्याची खरी, श्वेत वरू नये