तू पोशाख आहेस तुझ्या आत्म्याचा

तो उतरला त्याचा जिना
मला वर नेण्यासाठी
मी दोन्ही हात पसरले
त्याला कवेत घेण्यासाठी

अचंबित झाला पाहून मला
क्षणभर थोडा दचकलाही
माझा स्वागत सोहळा पाहून
पेचक्या आवाजात पचकलाही

म्हणाला......

तुला काय मी एक मित्र वाटतो?
का तू आहेस पूर्ण वेडा
का घेत नाहीस धसका माझा
दिसत नाही का माझा रेडा

अरे मी तुझा शेवट आहे
प्रत्येकाला मी एकदाच भेटतो
तू पोशाख आहेस तुझ्या आत्म्याचा
मी ते नेण्याचं काम करतो

मी उत्तरलो.......

तुझं भय मी का बाळगू
आयुष्याचं तूच एकमेव सत्य चित्र आहेस
नाहीतर स्वार्थापायी जमणारी नाती गोती
तू एकदाच भेटणारा खरा मित्र आहेस

गहिवरून आलं माझं बोलणं ऐकून
मैत्रीच्या सुरात मग तो म्हणाला
तुझ्यासारखा मित्र या धरतीवर, मग
का देह माझा परलोक जन्मला

मी म्हणालो चल उठ मित्रा
लॉंड्रीवाल्याचं काम तू कर आधी
आपल्या मैत्रीची आज न उद्या
बांधतील त्रिलोकी समाधी

....सनिल पांगे