निळ्याशार उदधिमधूनी
चार थेंब उचलून घ्यावे..
जीवनाच्या अंतापर्यंत
ओंजळीत जपून ठेवावे..
कधी वाटते होऊन मोती
शिंपल्यामध्ये लपून राहावे...
अथांग अफाट पसरलेल्या
उदधींचाच एक भाग व्हावे..
कधी वाटते होऊन मासा
कुशीत त्याच्या खेळत राहावे..
क्षितिजावरती लपणाऱ्या त्या
दिनकराला भेटून यावे..
कधी वाटते होऊन गलबत
लाटांवरती स्वार व्हावे..
कधी वाटते होऊन शशी
लहरींना त्या रिझवावे....
काय वाटते मज कसे पुसावे
परि त्याला मात्र पाहत राहावे..
जमलेच कधी तर सागरा त्या
समेटून या कवेत घ्यावे...
- प्राजु.