प्रतोद पुन्हा येत आहे -१

 जवळ जवळ ३२ वर्षापूर्वी म्हणजे १९७५ मध्ये मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञानकथास्पर्धेत मी एक कथा पाठवली होती (आणि हो तिला उत्तेजनार्ह पारितोषिकही मिळाले होते.)त्या कथेत परग्रहावरील प्राणी त्यांचा ग्रह रहाण्याला कुचकामी झाला म्हणून पृथ्वीवर आक्रमण
करण्याचा बेत करत आहेत अशी कल्पना केली होती. नुकताच पृथ्वीसदृश एक ग्रह आपल्या सूर्यमालेच्या बाहेर अस्तित्त्वात आहे असा संशोधकानी दावा केला आहे या पार्श्वभूमीवर तीच कथा पुन्हा लिहिली तर कशी लिहिली जाईल याचा हा प्रयत्न ! मूळ कथेचे नाव 'प्रासूर परत येत आहे' असे होते ते बदलून 'प्रतोद परत येत आहे 'असे केले आहे कारण मनोगतचे चाणाक्ष वाचक  निश्चितच समजतील. 
         प्राकार उपग्रह केंद्रावरून येणाऱ्या संदेशातील शेवटच्या चार शब्दानी प्रा. विश्वामित्र मोठ्या चिंतेत पडले होते, त्या सदेशासाठी वापरण्यात आलेली सांकेतिक भाषा ते स्वत: आणि त्यांचा मुलगा प्रद्योत या दोघानी तयार केलेली होती .प्रद्योतच्या आठवणीने क्षणभर त्यांचे डोळे पाणावले.कारण आज बऱ्याच दिवसानी त्याच्याशी असा दुरून का होईना संपर्क साधत होता.प्रद्योत आज या जगात नव्हता पण तो या विश्वाच्या पसाऱ्यात नक्कीच कुठेतरी आहे अशी आशा त्याना वाटत होती आणि या संदेशाने तब्बल एक वर्षाने त्यावर शिक्का मोर्तब होत होते.खरे तर त्यामुळे त्याना आनंदच व्हायला हवा होता पण विश्वामित्रांच्या चिंतेचे कारण होते त्या संदेशातील चारच शब्द आणि ते होते,प्रतोद पुन्हा येत आहे.
            प्रतोद पुन्हा येत आहे. हे शब्द त्यांच्या मनात फेर धरून नाचू लागले आणि त्याच्यापाठोपाठ एक वर्षापूर्वीची ती जीवघेणी घटनाही ! त्या आठवणीने त्यांच्या हृदयात अजूनही असह्य कळ येत असे.त्यादिवशी संध्याकाळी प्रद्योत त्यांचा लाडका थोरला मुलगा त्यांच्या नजरेसमोर नाहीसा झाला होता आणि ते दृश्य पहात बसण्याशिवाय त्याना काहीच करता आले नाही.
      प्रतोद,प्रबाहू आणि मारिच या तीन ग्रहांवर बुद्धिमान प्राण्यांचे अस्तित्व आहे याबद्दल आपले निरीक्षण प्रा.विश्वामित्रानी नुकतेच नोंदवले होते आणि त्याचबरोबर या प्राण्यांपासून अखिल मानवजातीस धोका संभवतो हेही भाकित त्यानी वर्तवले होते,पण त्यांचा पहिला बळी ज्याच्याकडे आपल्या संशोधनाचा वारसा चालवण्याची जबाबदारी सोपवण्याची आपली इच्छा आहे तो आपला मुलगा प्रद्योतच असेल हे मात्र त्यान अपेक्षित नव्हते.
      तो प्रसंग आत्ताच घडून गेल्यासारखा त्यांच्या नजरेसमोर  दिसत होता  नेहमीप्रमाणे ते आणि प्रद्योत आपल्या प्रयोगशाळेच्या सभोवतीच्या मोकळ्या मैदानाची पहाणी करत होते.त्यामध्ये प्रतोद,प्रबाहू आणि मारिच या निरनिराळ्या ग्रहांसारखे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता.आज प्रतोद या ग्रहासारखे वातावरण निर्माण करून काही प्रयोग करण्याचे त्यानी ठरवले होते.ते वातावरण निर्माण करण्यात आपण कितपत यशस्वी झालो आहोत याविषयी प्रद्योतशी ते चर्चा करत होते.तेवढ्यात एका अगदी अनपेक्षित आवाजाने दोघांचेही चित्त विचलित झाले.तो आवाज होता टाळीचा आणि त्यापाठोपाठ शब्द ऐकू आले,
   " अभिनंदन प्राध्यापक महोदय"
दोघानीही आवाजाच्या दिशेने पाहिले आणि आश्चर्याने दोघांच्याही जिभा टाळ्याला चिकटल्या.त्यांच्यापासून अंदाजे पन्नास मीटर अंतरावर एक घुमटाकार यान उभे होते आणि त्याच्यासमोर उभा राहून एक विचित्र प्राणी त्यांच्याकडे पाहून बोलत होता‍  जेमतेम एक मीटर उंचीच्या त्या प्राण्याच्या शरीरावर दाट तपकिरी रंगाचे आवरण होते आणि चेहऱ्यावर त्याच रंगाचा मुखवटा होता.त्याच्या पाठीवर एक नळकांडे होते त्यापासून एक नळी निघून सोंडेसारखी मुखवट्याच्या तोंडाच्या भागास चिकटली होती.त्या मुखवट्याच्या कपाळाच्या बरोबर मध्यभागी एक चमकदार हिऱ्यासारखा पदार्थ बसवलेला होता.
      " विश्वामित्रजी,आमच्या प्रासूर ग्रहासारखे वातावरण निर्माण करण्याच्या तुमच्या प्रयोगाबद्दल मी बोलत आहे,आणि आपला प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन करत आहे.पण त्याचमुळे प्रद्योतला घेऊन जाणे आम्हाला आवश्यक झाले आहे,कृपया त्याला येथे सोडून ताबडतोब येथून निघून जावे ही विनंती म्हणा किंवा आज्ञा समजा "  " आणि तसे करण्याचे मी नाकारले तर?" विश्वामित्रानी हार न मानण्याच्या आपल्या वृत्तीनुसार विचारलेच.
" प्रोफ़ेसर खरे तर मी आपल्याला काही सांगावयास हवे असे नाही कारण आपणास सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे.तुम्ही मानवानी आमच्या ग्रहाच्या वातावरणात जी ढवळाढवळ चालवली आहे ती थांबवण्यासाठी जी पावले उचलावी लागणार आहेत त्यातले हे पहिले पाऊल आहे.प्रद्योतला मी बरोबर घेऊन जात आहे,पण घाबरू नका त्याला कुठलाही धोका नाही.फक्त आम्ही त्याच्यावर काही प्रयोग करणार आहोत.मात्र मला अडवण्याचा प्रयत्न करू नका कारण तसे केल्यास माझ्या कपाळावरील लेसरगन मी कार्यान्वित करेन आणि तिच्या किरणात तुमच्या प्रयोगशाळेसकट तुम्हा दोघाना भस्मसात करण्याचे सामर्थ्य आहे तेव्हा बाळ प्रद्योत,शहाण्यासारखा माझ्याबरोबर या यानात बस"
      प्रद्योतने एक मजर विश्वामित्रांकडे टाकली,आणि ते दिङमूढ झाल्यासारखे दिसल्यामुळे प्रतोदबरोबर जाऊन सर्वनाश टाळणेच शहाणपणाचे असा विचार करून तो यानाच्या दिशेने चालू लागला आणि विश्वामित्र हताशपणे त्याच्याकडे पहाण्यापलिकडे काहीही करू शकले नाहीत.
     बस तीच त्यांची आणि प्रद्योतची अखेरची भेट.
     विश्ववार्ताच्या आणि अनेक इतर वाहिन्यांच्या वार्ताहरानी विश्वामित्राना अनेक प्रश्न विचारून हैराण केले.पृथ्वीप्रमुखानी ताबडतोब सांत्वनसंदेश पाठवला येवढेच नव्हे तर युवो (United Worlds)मध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला‌ सर्व ग्रहवासियानी या घटनेचा तीव्र निषेध केला.प्रतोदवरूनही या घटनेचा निषेध करणारा संदेश आला त्यात हा अतिरेकी हल्ल्याचा प्रकार असून प्रतोदच्या राजवटीचा त्यास मुळीच पाठिंबा नाही मात्र पृथ्वी वासीयानी प्रतोदवर हल्ले करण्याचा विचार करू नये असे म्हटले होते.मारिच आणि प्रबाहूवरून आलेल्या संदेशात आंतर्ग्रहीय दहशतवादाचा सामना करण्यासाठी एक सर्वग्रहीय आघाडी उघडण्यासाठी लागेल ती मदत देण्याची तयारी असल्याचा उल्लेख होता.
      विश्वामित्रांच्या प्रयोगशाळेस अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था देऊ करण्यात आली मात्र त्यावरच पूर्णतया विसंबून रहाण्यात अर्थ नाही हे विश्वामित्राना माहीत होते,कारण आपल्या संशोधनावर जळणारे काही अतृप्त आत्मेच आपल्या प्रयोगशाळेवर हल्ला करून ते प्रतोद किंवा इतर परग्रहावरून झाल्याचे भासवण्याचीही शक्यता आहे हे त्याना माहीत असले तरी या गोष्टीवर विश्वप्रमुख विश्वास ठेवणार नाहीत आणि त्यावर चर्चा करून काही फायदा न होता कटुता मात्र वाढेल ही कल्पना असल्यामुळे आपली काळजी स्वत: च घ्यायची हे त्यांचे ठरलेले धोरण होतेच.
          प्रद्योतच्या अपहरणाचा धक्का पचवून हळूहळू त्याचा लहान भाऊ प्रपातवर लक्ष केंद्रित करण्यास त्यानी सुरवात केली आणि तोही त्यांच्या तालमीत तयार होऊ लागला होता.प्रद्योतला नेण्यात प्रतोद यशस्वी झाला होता कारण त्यावेळी विश्वामित्राना त्याने बेसावधपणे पकडले होते पण आता अखंड सावध रहायचे हा त्यांचा निश्चय होता शिवाय प्रद्योतकडून आलेल्या संदेशामुळे ते अधिकच जागृत झाले आणि आपल्या कल्पनेस पूर्ण रूप देण्याच्या तयारीला लागले.या कामी त्याना लागेल ते सहकार्य विनाविलंब देण्यात यावे अशा सूचना सर्व संशोधनकेंद्राना होत्या अर्थातच प्रतोदच्या स्वागताची तयारी करणे त्याना सहज शक्य होणार होते.
            पण प्रतोदवासीयांनाही यावेळी आपले धक्कातंत्र उपयोगी पडणार नाही याची कल्पना होतीच त्यामुळे प्रद्योतच्या संदेशानंतर थोड्याच दिवसानी विश्वामित्रांच्या संगणकावर एक संदेश आला तो प्रतोदवासियांचा होता‌. संदेश असा होता," आम्ही मैत्रीचा हात पुढे करत आहोत.पृथ्वीवासियानी त्याचा मान राखावा."याव्र निर्णय घेण्यासाठी विश्वामित्राना पृथ्वीप्रमुखांशी चर्चा करणे आवश्यक होते,त्यामुळे तशा अर्थाचा संदेश प्रतोदला पाठवून विश्वामित्रानी पृथ्वीप्रमुखांशी संपर्क साधला.ट्यानीही प्रसंगाचे गांभीर्य जाणून ताबडतोब आपल्या विश्वासू मंत्र्यांची दूरदर्शन बैठक बोलावून त्यात विश्वामित्राना आमंत्रित केले.
           बैठकीच्या सुरवातीसच पृथ्वीप्रमुखांनी सर्व उपस्थिताना प्रतोदवरून आलेल्या संदेशाची माहिती दिली आणि यावर आपले मत मांडावयास सांगितले‌. संरक्षणप्रमुख रुद्र यानी प्रथम सुरवात केली.
 " माझ्या मते विश्वशांतीस मोठा धोका आहे अशा वेळी कोणतेही चुकीचे पाउल टाकून आपण परिस्थिती गंभीर होऊ देणे योग्य नाही."
  "होय मग त्यासाठी आपण काय करायचे?'प्रा.विघ्ने नेहमीच्या उताविळीने मध्येच बोलले.
    " या बाबतीत प्रा.विश्वामित्र काय म्हणतात ते ऐकू या " पृथ्वीप्रमुखानी चर्चा भरकटू नये म्हणून मध्ये हस्तक्षेप करत म्हटले.आणि विश्वामित्रांकडे पहात ते पुढे म्हणाले,"प्रतोद पुन्हा येणार याची कल्पना मिळाल्यावर आपण कोठल्या प्रकारची तयारी केली याची माहिती येथे जमलेल्या सन्माननीय सभासदाना आपण देऊ शकाल काय ?"
     "माननीय महोदय," विश्वामित्र बोलू लागले,"तसे करणे योग्य होणार नाही कारण ही माहिती  गुप्त रहाणे आवश्यक आहे."
      "असे म्हणून विश्वामित्रजी येथे जमलेल्या सर्व सदस्यांवर अविश्वास दाखवीत आहेत"संरक्षणमंत्री उद्गारले.
       " कृपया माझ्या शब्दातून भलताच अर्थ काढू नका,आपण ज्या ग्रहावरून आलेल्या संदेशावरून येथे जमलो आहोत त्या प्रतोदवरील रहिवासी वैज्ञानिक क्षेत्रात आपल्यापेक्षा कितितरी अधिक प्रगत आहेत त्याचमुळे ते प्रद्योतला आपल्या समोर घेऊन जाऊ शकले,कदाचित आपल्या या सभेचा वृत्तांत त्यांच्यापर्यंत आत्ताही पोचत असेल अशा परिस्थितीत येथे चर्चा केल्यास आपल्या तयारीची त्याना आगाऊ कल्पना दिल्यासारखेच होईल."
   " आपण अगदी बरोबर मुद्दा उपस्थित केला आहे अशा परिस्थितीत आपले काय म्हणणे आहे?" पृथ्वीप्रमुखानी विचारले. "आणि अशावेळी त्यानी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारणेच इष्ट दिसते"अशी पुष्टी त्यानी जोडली.विश्वामित्र हा विचार घेऊनच तेथे आलेले असल्यामुळे त्यानी ताबडतोब ,"प्राप्त परिस्थितीत मला तरी हाच पर्याय योग्य वाटतो"असा उद्गार काढला.
' परंतु याप्रकारे मैत्रीचे नाटक करून आपला विश्वासघात करण्याचा त्यांचा विचार असू शकतो"प्रा.विघ्ने मध्येच बोलले.विश्वामित्रांमुळेच अंतराळसंशोधनसंस्थेचा प्रमुख बनण्याची आपली संधी हुकली असे त्याना वाटत असे आणि ती जखम अशी मधून मधून ठुसठुसत असे.
'तसे झाल्यास त्यांचा समाचार कसा घ्यायचा याविषयी आपल्याकडे काही योजना आहेत का प्रा.विघ्ने ? असल्यास त्या गुप्तपणे माझ्यापुढे आपण सादर करू शकता."असे पृथ्वीप्रमुखानी म्हटल्यावर फक्त तोंडातच जोर असणाऱ्या विघ्ने याना गप्प रहाण्यावाचून पर्यायच नव्हता.
"एकूण प्रतोदवासियांशी संपर्क साधून त्यानी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वीकारण्याचा आपला निर्णय त्याना कळवण्याचे अधिकार आपण विश्वानित्राना देत आहोत असा निर्णय आपण घेत आहोत.यावर कोणताही दुसरा पर्याय नाही असे समजावयाचे का?"या पृथ्वीप्रमुखांच्या बोलण्यावर कोणीच शंका उपस्थित न केल्यामुळे बैठक तेथे समाप्त झाली.