नळ सुंदरी

नळावरच्या लायनीत काल जावच लागलं

पुरषासारखा पुरुष असुन

त्या बायांच्या राज्यात आंग चोरुन उभ रहावच लागलं

वहीनी आमची चवथ्यांदा पोटुशी ऱ्हाली

तीचं करुन करुन माय कमरत वाकली

आज मग बाबुला उदबत्या विकयला धाडलं

आन माझ नशीब ह्या नळावरच आडलं

इतक्यात ती समोरुन आली...

मला थितं उभं पाहुन डोळ्यातुन हासली

तिचा लंबर आज माझ्या मागंच लागला होता

आन हा आजुबाजुचा ग्वोंगाट मला मुजिक वाटु लागला होता..

सावत्याच्या म्हातारीच आन शेजारच्या काकींच चांगलच जुंपलं होत...

हितं मात्र माझ आन तीचं एवाना बरोब्बर जुळल होतं...

पयल्यांदाच हा नळ मला गंगे सारखा वाटला होता..

काठावरचा चाळीचा शीन स्वर्गावानी नटला होता..

हा हा म्हणता दोन तास दोन मिनीटात उडाले

शेवटी माझ्याशी बोलण्यासाठी तिने ओठ उघडले..

"नंबर तुझा आहे.. पण मला भरु देशील का पाणी?"

निसत्या आवाजानचं माझ्या मनात नचु लागली गाणी..

येड्यासारखा मग मी नुसताच लाजलो

हसत हसत तिच्या मागे उभ ऱ्हायलो

घागर भरुन होताच घरी लागली जाउ

च्यायला जाता जाता म्हणली..."धन्यवाद भाऊ !!! "