इशारा

हे बुद्धीवंतांनो
प्रकांड पंडितांनो
धुरंधर राजकारण्यांनो
समाजनीतीतज्ज्ञांनों
तुमचे
सर्वोच्च सन्मान - सत्कारास
पात्र कार्य
सामान्य जनांच्या
फार डोळ्यावर येऊ देऊ नका
अथवा...

एक दिवस,
शब्दातीत असूया-मत्सराच्या
हेवा वा ईर्षेच्या
भयकारी लाटांच्या
पाठीवर आरूढ झालेले
वा
महाभयंकर विखारी
गरळ ओकणाऱ्या शेषाच्या
फण्यावर स्वार झालेले

हे, बिथरलेले समाजमन वाहणारे
सामान्यजन
तुमचे
अनभिषिक्त सम्राटपद
असे हिरावून घेतील की,
भिक्षेचा कटोरा हाती घेण्याचे
बळही नसेल तुमच्या बाहूत
शेवटच्या श्वासापर्यंत