उंच हिरव्या फांदीवरती
संजीवन बहरत होते,
दोन इवले लाल जीव
संसार मांडत होते....
धागा धागा जोडून ती
फांदी नटली होती,
इवलीशी काडी मात्र
तिला आधार वाटत होती....
बघता बघता फांदीला
एक रूप मिळाले होते,
लाल काळे दोन गोळे
तिथे विसावले होते....
दिन सरला, रात्र उलटली
नवजीवनाची चाहूल आली,
चैतन्याची एक लहर
फांदीस त्या मोहरवून गेली....
जगण्यातले खरे सुख आता
फांदीला त्या कळले होते,
त्या पाखरांचे "मातृत्व" ही
आता तिने पत्करले होते....
- प्राजु.