असेच होते

पाऊस येता असेच होते
तुझ्यासाठी मन पिसेच होते

भरून येता घनात वादळ
तुझाच आठव मनात केवळ

अशी लकाके वीज नभावर
तुझ्या हसूचा भास...क्षणभर

पाऊस येता मन बावरते
सुसाटते, तुजसाठी धावते

पाऊस होतो तुझीच चाहूल
सरीसरींतून तुझेच पाऊल

पाऊस गातो तुझेच गाणे
मनी छेडतो तुझे तराणे

पाऊस सरतो मला भिजवूनी
ओढ तुझी तन्मनी रुजवूनी

सांग प्रिये तू होशील ना सर
तशी लाघवी, तशीच सुंदर

अंगांगी जाशील का भिनवूनी
तव श्वासांचे ते अमृतस्वर!

अ-मोल