गंगामाई
एके दिवशी स्वप्नामध्ये गंगामाई येउन गेली
'सोबत उरली थोडी अपुली ', म्हणून डोळे पुसून गेली
जातांना मज श्रीमंतीचे वरदान बघा देउन गेली
एके दिवशी स्वप्नामध्ये गंगामाई येउन गेली...
आम्हा मुक्ती देण्याकरता जळकी प्रेते साहुन गेली
काळे पाणी तिला दिलेले मूकपणे ती पिउन गेली
आमच्या साऱ्या कचऱ्यामुळेच गंगा तुडुंब भरून गेली
वैश्विक उष्म्याच्या धमकीने तीही मनात खचून गेली!
दूर सारले आळसास अन् मी बोलविला टॅन्कर एक
हौदांमध्ये पाणी भरले ठेवुन नोकर लगेच अनेक
बाटलीमध्ये पाणी होते.. लेबल होते हो 'गंगेचे'!
सार्थक केले त्या गंगेने माझ्या साऱ्या आयुष्याचे
सोने नाणे फ्लॅट रोकडा हा जमाना प्लॅनिंगाचा
विसर कसा हो पडेल सांगा अशा माणसां मग मुक्तीचा?
काळ वेळ येता 'ती गंगा' येईल का हो आधारा?
' मोक्षाचा या उपाय सोपा' ,उद्योगाचा माझ्या नारा !
साऱ्यांना मी पाणी विकतो बाटलीतले किती ऐटीत
एक्सपोर्टची ऑर्डर मोठी आहे माझ्या खिशात
त्या गंगेच्या खोऱ्यात उभे कॉंक्रिटकशिदा बघा गालिचे
तसेही गंगेला बोलावणे होते हो!.. सरस्वतीचे..कधीचे!
-सोनाली जोशी