आम्ही तो केवळ भारवाही ! 'मनोगत'चा पहिलावहिला दिवाळी अंक जगभरातील आमच्या वाचकांसाठी सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मराठी जनांना आपल्या भावना, विचार मराठीतच व्यक्त करता याव्यात, लिहिता याव्यात, बोलत्या याव्यात, आपले मनोगत इतरांपुढे मांडता यावे, इतरांचीही मनोगते जाणून घेता यावीत, यासाठी हे संकेतस्थळ चार वर्षांपूर्वी (१५ ऑगस्ट २००३) सुरू करण्यात आले. चार वर्षांची ही वाटचाल पूर्ण होत नाही तोच आपल्यापुढे दिवाळी अंकही सादर करण्याची ही सुसंधी आम्हाला प्राप्त झाली, ती केवळ आपणा सर्वांच्या 'मनोगत'वरील निखळ प्रेमामुळे व निरपेक्ष जिव्हाळ्यामुळेच. अंधाराचा नाश करून जीवनाला प्रकाशाकडे नेण्याचा संदेश घेऊन येणारा मंगल सण म्हणजे दिवाळी. आकाशकंदील, पणत्या, फटाक्यांची आतषबाजी, अंगणातल्या रांगोळ्या, फराळाचे ताट, पक्वांन्नांचे जेवण...आणि हो, वेगवेगळ्या विषयांवरील तऱ्हेतऱ्हेचे दिवाळी अंक...ही आपणा सर्व मराठीजनांची दिवाळीची कल्पना. दिवाळीत उत्साह, उल्हास, उत्सव हे तर सारे असतेच, पण या साऱ्यांवर कळस चढवतो, तो दिवाळी अंक. काळानुसार दिवाळी अंकाचे स्वरूप वेळोवेळी बदलत गेले. सभोवतालची, मनातली व्यामिश्रता कवेत घेऊ पाहणारे साहित्य निर्माण होऊ लागले. ते दिवाळी अंकात आवर्जून प्रसिद्धीही पावू लागले. महानगरीय संवेदनांची अनेकानेक प्रतिबिंबे साहित्यात उमटू लागली. आज एकीकडे ही महानगरीय संवेदना तर साहित्यात प्रकटत आहेच, पण आता या संवेदनेला आणखी व्यापकता, महाव्यापकता लाभली आहे आणि ती म्हणजे आंतरजालाद्वारे प्रसारित होणाऱ्या वैविध्यपूर्ण साहित्याची. हजारो मैल दूर असलेल्या आपल्या मित्राची, मैत्रिणीची (येथे अन्य नातीही अनुस्यूत आहेतच) भावना क्षणात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते...ही किमया केली आहे आंतरजालाने. याला साक्षीदार आहे आंतरजालावरील प्रत्यही वाढणाऱ्या संकेतस्थळांचे आणि अनुदिनींचे प्रमाण. 'माणसाच्या पोरा'ची व्यक्त होण्याची ही भूक अशीच वाढत जाणार आहे आणि ती पुरवण्यासाठी समर्थ आहेत मराठी संकेतस्थळे. 'मनोगत'ने चार वर्षांपूर्वीच काळाची ही 'आंतर्देशीय' पावले ओळखली आणि जगभरातील समस्त मराठीजनांच्या भावनांना, विचारांना उद्गार देण्याचे ठरवले. तुम्हा सर्व वाचकांचा, साहित्यिकांचा विपुल प्रतिसाद लाभला आणि आशयसंपन्नता आणि तांत्रिक सफाई अशा दोन्ही आघाड्यांवर 'मनोगत' गेल्या चार वर्षांत काही प्रगती करू शकले. जगभरातील 'साहित्यपिपासूं'चे दर्जेदार लेखन 'मनोगत'ने जगभरातील रसिक-मराठी वाचकवर्गापर्यंत सातत्याने पोहोचवले. एवढेच नव्हे तर लेखनाच्या वाटेला न गेलेल्या एका मोठ्या वर्गाला लेखन करण्यास उद्युक्तही केले. गेली चार वर्षे हे काम 'मनोगत'ने सातत्याने केले. आता याचेच पुढचं पाऊल म्हणजे हा दिवाळी अंक. कथा, कविता,ललित लेख, मुलाखती, प्रवासवर्णन, पुस्तकपरिचय... असे नानाविध साहित्यप्रकार 'मनोगत'च्या या पहिल्याच दिवाळी अंकात आपल्याला वाचायला मिळतील. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगळ्या रंगांनी सजणाऱ्या-नटणाऱ्या निसर्गाप्रमाणेच अनेकरंगी, अनेकपदरी असा हा दिवाळी अंक म्हणजे मनोगतींच्या भावविश्वाचाच आरसा आहे...साहित्य पाठवणाऱ्या मनोगतींच्या भरघोस पाठिंब्यामुळेच हा अंक साकार होऊ शकला यात शंका नाही. त्या सर्वांचे संपादक मंडळ ऋणी आहे. या अंकाच्या संपादकांपैकी कोणी संपादक पुण्यात, कोणी हैदराबादेत,कोणी अमेरिकेत तर कोणी इंग्लंडात! अंकाचे मानकरी असणारे सर्वजणही असेच जगभर विखुरलेले. संपादक मंडळींनी आंतरजालाचेच साधन बनवून या अंकाचं नियोजन केले, प्रत्यक्ष कामही केले आणि त्याची बांधणी करून तो साकार केला. प्रत्येकच पहिलावहिल्या प्रयत्नात अडचणीही येतातच, तशा आम्हालाही आल्या...पण त्यांवर मातही करता आली. जास्तीत जास्त निर्दोष अंक काढण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पण काही त्रुटींची जाणीव आम्हाला आहे. सर्वच विषयांना स्पर्श करण्याचे ठरवले तरी ते शक्य झालेले नाही. उदाहरणार्थ: समकालीन जगण्यातील राजकारण, अर्थकारण असे काही विषय या दिवाळी अंकात हाताळले गेले नाहीत, हे खरे. पण 'मनोगत'चे आणि जगभरात विखुरलेल्या मनोगतींच्या साहित्यविश्वाचे हे एकत्रित रूप आपणा सर्वांना आवडेल अशी आम्हाला आशाच नव्हे तर खात्री आहे... आपणा सर्वांना दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मनोगतचा पहिलाच दिवाळी अंक आपल्या हाती सुपूर्त करत आहोत. एकापरीने हे म्हणजे तुमचेच तुम्हाला, म्हणजे धन्याचाच माल धन्याला दिल्यासारखे आहे...पण त्यातही खरा आनंद आहे आणि ...'आम्ही तो केवळ भारवाही' आहोत! सर्व मनोगतींना दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!
|