एक वेगळे ऑम्लेट

  • चार अंडी
  • चार मध्यम आकाराचे कांदे
  • चार मध्यम आकाराचे टोमॅटो
  • दोन हिरव्या मिरच्या, कोथिम्बीर
  • हळद, मीठ, मिरपूड, इ
  • तेल
३० मिनिटे
चार जणाना न्याहारीला (पावासहित)

कांदे, मिरच्या व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.

निर्लेपच्या तव्यावर १ मोठा चमचा (२ टेबलस्पून) तेल गरम करावे. (मोठी ज्योत)

तेल धुरावल्यावर मिरच्या टाकाव्यात आणि दहा ते पंधरा सेकंदात कांदा टाकावा. जास्त उशीर केल्यास मिरची जळते.

ज्योत बारीक करून हळद आणि मीठ घालावे आणि चांगले हलवावे.

हा कांदा उलथण्याने थोपटून तव्यावर पसरवावा. त्या बिछान्यावर चिरलेला टोमॅटो पसरावा. खालचा कांदा फारसा हलणार नाही याची काळजी घ्यावी.

झाकण ठेवून एक हलकी वाफ आणावी.

आता अंडी एक एक करून फोडावीत आणि हलकेच वर्तुळाकार कांदा टोमॅटो च्या थालीपिठावर चार कोपऱ्यात चार अंडी सोडावीत. पिवळा बलक शक्य तेवढा अख्खा ठेवावा. पांढरा बलक पसरेल, त्याला इलाज नाही.

झाकण ठेवून एक वाफ आणावी. आता पिवळा बलक शिजत आला असेल. त्यावर अंड्यापुरेसे मीठ व मिरपूड शिंपडावे. परत झाकण ठेवून एखादा मिनिट वाफ आणावी. जास्त झाल्यास अंडी चिवट होतात.

खाली उतरवून कोथिंबीर घालावी.

हा प्रकार अशा प्रकारे करतात असे अर्धवट दिग्दर्शन एका मित्रवर्यांनी वीस वर्षांपूर्वी केले होते. या प्रकाराला स्पॅनिश एग्स म्हणतात असे त्यांचे मत होते. त्यात हळद घातली नाही तर त्याला इटालियन एग्स म्हणतात असेही ते म्हणाले. परंतु हे उद्गार काढते समयी त्यांच्या रक्तातील मद्यार्काचे प्रमाण पाहता माझा त्यावर विश्वास बसला नाही. तरीही ते खरे असेल तर माझी हरकत नाही. मी मला समजले त्याप्रमाणे तो पदार्थ केला.

झालेला पदार्थ वाढताना प्रथम लाकडी उलथण्याने आधी चार चतकोर करून घ्यावेत आणि एकेक तुकडा हलकेच ढकलून ताटलीत काढावा.

यासोबत लसूण लावलेला पाव (garlic bread) छान लागतो.

आवडत असल्यास बारीक चिरलेला पुदिनाही घालता येतो.

एकदा हात बसला की बारीक चिरलेली ढबू मिरची चालून एक थर वाढवता येतो.

अर्धवट ऐकीव ज्ञान + प्रयोग