कॅस पहिल्यांदा लागू करायचा ठरले तेंव्हाचा हा लेख आहे. तरीही सध्याही परिस्थितीत काही फार फरक नाही.
कॅसवरुन सध्या जो गदारोळ चालू आहे तो पाहिला की भारतीय समाजाच्या मानसिकतेचे फारच आश्चर्य वाटते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही सामान्य जनतेने इतक्या मोठ्या प्रमाणावर भाग घेतला नसावा. वर्षानुवर्षे अनेक क्षेत्रांत निमूटपणे 'कंडिशनल ऍक्सेस' चे जू मानेवर पेलणाऱ्या या असहाय्य जनतेला या किरकोळ ओझ्याचे भय वाटावे ? मंडळी या विषयावर तावातावाने लिहिताहेत, चर्चा करतायत, अगदी जिवावरचा प्रसंग आल्याप्रमाणे लढताहेत. सरकारचे काम कुठल्याही कामात घोळ घालणे हेच असते. पण यावेळेस सर्व संबंधितही त्यास आपापल्या परीने हातभार लावत आहेत.
ज्या देशांत 'सर्वांना समान संधी' हे आश्वासन फक्त घटनेतल्या कागदावरच रहाते, त्या देशातल्या लोकांनी कॅसचा एवढा बाऊ का करावा ?
कुठल्या घरांत आणि कुठल्या जातीत आपण जन्म घेणार हे कोणाच्याच हाती नसते. तसेच लिंग ठरवण्याचे स्वातंत्र्यही आपल्याला नसते. तसे ते जगाच्या पाठीवर कोणालाच नसते. पण आपल्या देशात ते एकदा देवाने ठरवले की पुढचे फक्त आपल्या समाजाच्या हाती असते, आपण केवळ कळसूत्री बाहुली ठरतो. या जगांत पाऊल टाकताक्षणीच आपल्यावर अनेक कॅस लागू होतात. समजा, जन्मतःच तुम्हाला वैद्यकीय सेवेची जरुर भासली, तर ती मिळणार की नाही हे तुमच्या पालकांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. तसेच कोणी ओळखीचे वा नातेवाईक डॉक्टर जवळपास उपलब्ध आहेत की नाही यावर तुम्हाला किती चांगली ट्रीटमेंट मिळणार हे अवलंबून असते. नाहीतर आल्यापावली परत जाण्याची वेळ येऊ शकते.
शाळेत जायला मिळणार की नाही इथपासून ते कुठल्या शाळेत प्रवेश मिळणार हे सर्व तुमच्या कुटुंबाच्या सामाजिक स्थितीवर ठरते. पुढे मग जन्मभराच्या रहाटगाडग्यात एकदा बसलात की उच्च शिक्षण, विवाह, नोकरी, बढती या व अशा सर्वच प्रकारांत तुमच्या डोक्यावर एक अदृश्य सेटटॉप बॉक्स बसवला जातो.
जाहिरातीत दाखवण्यात येणारी सुंदर आलिशान घरे, अद्ययावत उपकरणे, उत्तमोत्तम खाद्यपदार्थ, चकचकीत मोटारी आणि नितळ त्वचेच्या सुंदर स्त्रिया या सामान्य माणसाने लांबूनच पाह्यच्या असतात कारण तसल्या जगांत त्याला कधीच प्रवेश मिळणार नसतो. सामान्य माणसाची सगळीकडूनच कोंडी होत असते. नोकरी मागणाऱ्यांना धंदा सुरु करण्याचे फुकट सल्ले मात्र मिळतात. पण तिथेही विशिष्ठ जातिसमुहांनी आपली मक्तेदारी निर्माण केलेली असतेच. कोणी परका त्यांच्या हद्दीत घुसलाच, तर समस्त ज्ञातिसमुह एकजुटीने नवागताचा गळा घोटतो. कला, क्रीडा या क्षेत्रांतही कांही वेगळे नाही. साहित्य, संगीत, अभिनय याही प्रांतात आधी तुमचे गोत्र बघितले जाते. समजा, प्रवेश मिळालाच तरी पुढील सर्व प्रगति तुमच्या पात्रतेपेक्षा दुसऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते.