फ्रेंच चित्रपट "द ऍक्स"

एक माणूस आपल्या गाडीतून एकाला उडवून आणि चाकाखाली चिरडून खून करतो. हॊटेल रूममध्ये येऊन जबरदस्त अस्वस्थ मनस्थितीत अंघोळ करतो आणि स्वतः:चा कबुलीजबाब ध्वनिमुद्रित करायला लागतो. या कबुलीजबाबामधून कथेचा पहिला भाग उलगडत जातो. तो एक कागद उद्योगातला उच्चपदस्थ व्यावसायिक होता. त्याला काही दिवसापूर्वीच त्याच्या कंपनीने खर्चकपात (cost cutting), एकीकरण (merger) अशी कारणे दाखवून पंधरा महिन्यांचा पगार देऊन काढून टाकलेले असते (lay off). सुरुवातीला त्याला असा विश्वास असतो की आपल्याला लगेच दुसरे काम मिळेल. पण सुमारे अडीच वर्ष प्रयत्न करूनसुद्धा काम न मिळाल्याने त्याचा धीर सुटायला लागतो. आणि अशा मनस्थितीत त्याच्या डोक्यात एक भयंकर कल्पना येते. इच्छीत पद प्राप्त करण्यासाठी त्याच्यापेक्षा लायक पाच-सहा उमेदवारांचा काटा काढून, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा खून करून स्पर्धा कमी करायची. तर हा चित्रपट आहे त्याच्या या कामगिरीचे खिळवून ठेवणारे चित्रण. दुसऱ्या खुनानंतर त्याला अपराधी वाटून तो चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेला कबुलीजबाब ध्वनिमुद्रित करतो. पण नंतर तो त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडतो व बाकी सर्व खुनांचा बेतसुद्धा अमलात आणतो. तर अशी ही भन्नाट कथा. यामध्ये एक छोटंसं उपकथानक पण आहे, त्याच्या मुलाच्या चोरीचं. तसेच पोलीस त्याला त्याच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या खुनाची माहिती एक संबंधित म्हणून द्यायला येतात, तेव्हा आपली एक संशयित म्हणून चौकशी करायला आले असतील असे वाटून त्याची भंबेरी उडते. घरातल्या सर्व सदस्यांपासून लपवून योजना अमलांत आणताना झालेली त्याची तारेवरची कसरत, या सर्व प्रकारांमध्ये उडालेली धांदल, पण निवडलेल्या मार्गाबद्दल असलेला त्याचा ठामपणा या सर्वांचा एक जबरदस्त वेगवान कोलाज म्हणजे हा थरारपट.
हा चित्रपट डोनाल्ड वेस्टलेक नावाच्या अमेरिकन लेखकाच्या "The ax" या कादंबरीवर आधारीत आहे. मुळात रहस्यकथा या स्वरूपात लिहिलेल्या कादंबरीला कोस्टा गावरास या फ्रेंच दिग्दर्शकाने ब्लॅक कॊमेडी या स्वरूपात पेश करून भांडवलशाहीच्या नफेबाजीच्या अमानुष वाटचालीवर एक जळजळीत सामाजिक व राजकीय भाष्य केले आहे. 
नायक झालेल्या जोस गार्सिया या कलाकाराने भूमिका अगदी समरसुन निभावली आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही आणि नक्कीच विचार करायला लावतो.

इथेही वाचा.