सच्चा विज्ञानप्रसारक

कालच्याच ईसकाळात हा अग्रलेख वाचायला मिळाला. वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिण्याची आवड आणि क्षमता असणाऱ्यांसाठी बोधक ठरेल ह्या हेतूने तो येथे उतरवीत आहे.

ईसकाळचा अग्रलेख (क्र. २) : सच्चा विज्ञानप्रसारक 
दि. ४ मे २००७

रा. वि. सोवनी यांच्या निधनाने मराठीत विज्ञानविषयक लेखनाचा अखंड यज्ञ चालविणारे व्यक्‍तिमत्त्व लोप पावले आहे. मराठी माणसांपर्यंत विज्ञान पोचावे, यासाठी त्यांनी लेखनाचा मार्ग अवलंबला. कोणत्याही प्रकारची वैज्ञानिक माहिती सध्या इंटरनेटवर सहज क्षणार्धात मिळते; पण सोवनी यांनी लेखन सुरू केले, तेव्हा विज्ञानविषयक देशी व परदेशी नियतकालिके, हेच माहितीचे स्रोत होते. हे स्रोत सर्वसामान्य वाचकांपासून लांब होते. ही दरी त्यांनी नेमकी भरून काढली. विज्ञानलेखनात केवळ विज्ञानविषयक घडामोडी कोणत्या घडल्या, कोणते शोध लागले, एवढीच माहिती पुरेशी नसते. या संशोधनाचा, विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या संशोधनाच्या दिशेचा एकंदर जगावर आणि आपल्या जगण्यावर काय परिणाम होतो, याचा वेध सातत्याने घ्यावा लागतो. शिवाय जटिल वाटणाऱ्या संज्ञांत जखडले गेलेले विज्ञान सर्वसामान्य वाचकाला अत्यंत सोपे करून सांगण्याची हातोटीही असावी लागते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचले पाहिजे, याचा अखंड ध्यास असावा असतो. हे सर्व गुण त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांनी मुख्यतः लेखनावर भर ठेवलेला असला, तरी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचावे, यासाठी विविध उपक्रमांद्वारे धडपडही केली. व्याख्याने आणि प्रत्यक्ष संपर्काचे मार्गही वापरले. महिला मंडळांत व्याख्याने देण्यापासून विविध सोसायट्यांत जाऊन तेथे सभासदांना गाठून ते संस्थापक सदस्य असलेल्या मराठी विज्ञान परिषदेची माहिती देणे, यासारखे उपक्रम त्यांनी राबविले. १९५२ पासून त्यांनी विज्ञानविषयक लेखनाला प्रारंभ केला आणि आपल्या अखेरच्या काळापर्यंत त्यांनी ते व्रत अव्याहत चालू ठेवले. गो. रा. परांजपे यांनी १९२८ मध्ये सुरू केलेल्या आणि अजूनही सुरू असलेल्या "सृष्टिज्ञान' या नियतकालिकात त्यांनी आपला लेखन यज्ञ
चालविला. सध्या चाळिशी-पन्नाशीत असलेल्यांना त्यांनी गजानन क्षीरसागर यांच्या "विज्ञानयुग' या मासिकात केलेले लेखन ठळकपणे आठवत असेल. कारण त्यात सोवनी यांच्या लेखनाचा ठसा सतत जाणवायचा. १९८० च्या सुमारास प्रकाशित झालेल्या त्यांच्या "कन्सल्टिंग रूम' या लेखसंग्रहातील सर्व लेख त्यांनी "किर्लोस्कर' मासिकासाठी लिहिले होते. मानवी शरीराची सर्वसामान्य वाचकांना ओळख करून देण्याचा हेतू या लेखनामागे होता आणि त्यासाठी त्यांनी विविध तज्ज्ञ डॉक्‍टरांशी चर्चा करून, त्यांच्या मुलाखती घेऊन हे लेखन परिपूर्ण केले. सोवनींनी लिहिले नाही, असे नियतकालिक किंवा वृत्तपत्र शोधावे लागेल. यातूनच त्यांच्या विपुल लिखाणाची कल्पना यावी. आकाशवाणी, दूरदर्शनसारख्या माध्यमांतूनही त्यांनी विज्ञानप्रसाराची गंगा सर्वत्र पोचविली. त्यांचा मूळ पिंड लेखनाचा होता आणि त्यासाठी ते भरपूर वाचन करीत. त्यांची ज्ञानतृष्णाही वाखाणण्याजोगी आणि आजच्या झटपट जमान्याच्या पार्श्‍वभूमीवर उठून दिसणारी होती. १९८४ मध्ये मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून निवृत्त झाल्यापासून आणि दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर बंधने येईपर्यंतची सुमारे २१ वर्षे सोवनी रूपारेलच्या वाचनालयात नेमाने हजर राहत आणि विविध देशी, परदेशी विज्ञानविषयक नियतकालिके, पुस्तके यांच्या जगात हरवून जात. त्यातून बाहेर पडले, की या जगापासून लांब असलेल्यांसाठी ते लेखणी सरसावून बसत. त्यांच्या जाण्याने विज्ञानप्रसाराचा ध्यास घेतलेला एक सच्चा सेवक हरपला आहे.