मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना ऋतू पेलताना..
बेभान वाऱ्यासवे शहारणारी तनू
एकेक कळी, पानं, फुलं जपत
त्याचा धसमुसळेपणा सांभाळताना...
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना धुंद होताना..
बोचऱ्या थंडीच्या चाहुलीने
नव रंगांच्या निर्मितीने
पानगळीसाठी सज्ज होताना...
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना रंग बदलताना..
केशरी, पिवळा, अबोली, डाळिंबी
असंख्य रंगांची झालर लेऊन
तेज:पुंज झळाळी दिमाखात मिरवताना..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना असवताना...
कडाक्याच्या थंडीत पर्णीसाठी झुरत
पांढऱ्याशुभ्र हिमाच्या गालिच्यावर
असहायपणे आसवे गाळताना..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना बहरताना..
वसंताच्या चाहुलीने आनंदून जात
नव्या निर्मितीचा ध्यास घेऊन
नवे रूप लेण्यास अधीर होताना..
मी पाहिलंय..
मी पाहिलंय त्यांना हसताना..
पल्लवित होऊन असंख्य रंग
अंगावर लेऊन, फुलांमध्ये पानांमध्ये
रमत प्रेमगीत गाताना...
मी पाहिलंय त्यांना... ऋतू बदलताना...!
- प्राजु.